फासेपारधी महिला खून प्रकरण : प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने केली बहिणीची हत्या
मुरगूड / वार्ताहर
सोळा वर्षांपूर्वी कुटुंबाच्या विरोधात जाऊन बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून मेहुण्याला भाला भोसकून मारण्याचा प्रयत्न करताना बहीण आडवी आल्याने तिचाच खून भावाकडून झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कर्नाटक सीमेनजीक असणाऱ्या लिंगनूर-कापशी जवळील माळरानावर घडली. महिलेच्या खून प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली.
येवनबाई सिकसेन भोसले (वय 35 वर्षे रा. लखनवाडा, ता. खमगाव, जि. बुलढाणा ) असे हत्या झालेल्या दुर्दैवी बहिणीचे नाव आहे. घटनेची फिर्यादी मयत येवनबाई हिचा पती सिकसेन मुरलीधर भोसले (वय ४५) यांनी मुरगूड पोलिसात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी येवनबाई हिचे भाऊ देवेंद्रप्पा आदमास पवार आणि टायटन आदमास पोवार ( दोघेही रा. अंजनगाव, जिल्हा अमरावती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.मात्र दोघेही आरोपी भाऊ फरारी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षांपूर्वी फासेपारधी समाजातीत येवनाबाई हिला सिकसेन मुरलीधर भोसले याने पळवून आणून प्रेमविवाह केला होता. हा प्रेमविवाह येवनाबाईच्या माहेरवासीयांना मान्य नव्हता. यावरून दोन्ही कुटुंबात बोलाचाली नव्हती. या घटनेचा राग पवार कुटुंबाच्या मनात धुमसत होता. याचा वचपा काढण्याची संधी पवार कुटुंबीयांनी मंगळवारी साधली. तथापी यामध्ये मेव्हण्याऐवजी बहिणीचाच बळी गेला.
मयत येवनाबाईचे माहेरवासी पवार कुटुंबीय हे फासेपारधी जमातीतील मूळचे अमरावती जिल्ह्यातील अंजनगावचे. गेल्या चार दिवसापासून हे कुटुंब कागल तालुक्यातील लिंगनूर येथे राहत होते. 'भावाचे लग्न ठरले असून तातडीने कुटुंबासह लग्नास यावे' असा निरोप पवार कुटुंबीयांनी मोबाईल वरून येवनाबाई व पतीला दिला.
त्यानुसार येवनाबाई व पती सिकसेन चार मुलांसह गोंदिया एक्सप्रेसने बुलढाण्याहून कोल्हापूर येथे पोहोचले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भोसले कुटुंबीय लिंगनूरला आले.
दोन्ही कुटुंबांची भेट झाल्यावर भावानी थेट वादाला सुरुवात केली. 'सोळा वर्षात तू बहिणीला आमच्याकडे का पाठवले नाहीस?' असा जाब विचारत व 'तुला जिवंत ठेवत नाही ' अशी धमकी देत टायटन याने मेव्हणा सिकसेनला पाठीमागून विळखा घातला. यावेळी देवेंद्रप्पाने आपल्याजवळील भाल्याच्या पात्याने सिकसेनला भोसकण्याचा प्रयत्न केला. पतीला वाचवण्याच्या हेतूने येवनाबाई मध्ये आली असता भावाने केलेले दोन्ही वार येवनाबाईच्या पाठीवर व छातीवर जिव्हारी बसले. ती रक्ताच्या थारोळ्यात जागीच ठार झाली. या वादात मेहुण्याऐवजी बहिणीचाच खून झाल्याचे पाहून दोघा भावांनी घटनास्थळावरून पळ काढला. ते अद्यापही फरारी आहेत.
घटनेचे वृत्त समजतास मुरगूड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे व मुरगूड पोलीस करत आहेत.
अंत्यसंस्कार मुरगूडात!
मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर पोलीस हवालदार प्रशांत गोजारे, संदीप ढेकळे आनंदा कुंभार, संतोष गांधीगिरी, सचिन पारखे, प्रशांत गोसावी, बबन बारदेस्कर, तानाजी कांबळे, सर्जेराव भाट, सोमनाथ यरनाळकर, जगदीश गुरव ओंकार पोतदार आदींच्या मदतीने मुरगूडातील वेकुंठ स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.