क्रिकेट स्टेडियमसाठीच्या 35 वर्षांच्या पाठपुराव्याला यश!
उपमुख्यमंत्री पवार यांनी एमआयडीसीकडील विकासवाडी परिसरातील 30 एकर जागा देण्यास दाखवली समर्थता : कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे जागा हस्तांतरीत करण्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले निर्देश, माजी खासदार संभाजीराजेंच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर प्रतिनिधी
क्रीडानगरी कोल्हापूरात फुटबॉल, कुस्ती, हॉकी आणि नेमबाजी इतकेच अनेक क्रिकेटपटूही आहेत. पण त्यांना सामने खेळण्यासाठी हक्काचे स्टेडियमच कोल्हापुरात नव्हते. स्टेडियम उभारले जावे यासाठी तब्बल 35 वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अनेक माजी अध्यक्ष व संचालक मंडळांने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्याला 35 वर्षांनी अखेर यश आले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिह्यांतील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी विकासवाडी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी 12 हेक्टर जागा कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे देण्याचे निर्देश एमआयडीसी अधिकारी व महसुल विभागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत मंगळवारी असोसिएशनच्या तळमळीला न्याय दिला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्याती 421 पैकी 12 हेक्टर (30 एकर जागा) जागा कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाकड हस्तांतरित करावी असेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, विकासवाडीतील जागेत क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठीचा श्रीगणेशा व्हावा यासाठी माजी खासदार व असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी स्टेडियम उभारण्यासाठीची जागा क्रीडा विभागाला द्यावी हा मुद्दा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुऊ ठेवला होता. त्याला गांभिर्याने घेऊन पवार यांनी मुंबईतील आपल्या समिती कक्षात मंगळवारी विशेष बैठक बोलवली. या बैठकीला संभाजीराजे छत्रपती यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट जिल्हा क्रिकेट असेसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, विद्यमान उपाध्यक्ष अभिजित भोसले, सचिव शितल भोसले व माजी सचिव केदार गयावळ व माजी सहसचिव जर्नादन यादव उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे हे देखील ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीच्या प्रारंभी संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरी क्रिकेट ज्वर, माजी खेळाडूंनी रणजी क्रिकेटसह क्रिकेटच्या वाढीसाठी दिलेले योगदान व कोल्हापूरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असणे का आवश्यक आहे, हे उपमुख्यमंत्री पवार यांना पटवून सांगितले. त्यावर बोलताना पवार म्हणाले, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर होत राहणाऱ्या क्रीडा स्पर्धांमुळे शहरी, ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला वलय प्राप्त होत आहे. त्यामुळे खेळ व खेळाडूंसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात दिवसेंदिवस क्रिकेट लोकप्रिय होत असून खेळाडूंच्या संख्याही वाढत आहे. पुढील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचाही समावेश असणार आहे. हा धागा पकडून शहरासह ग्रामीण भागात सर्वोत्तम क्रिकेटपटू घडवण्यासाठी कोल्हापूरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विकासवाडी येथील एमआडीसीच्या ताब्यातील गट क्रमांक 110 व 111 मधील 12 हेक्टर जागा कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे हस्तांतरित करण्याचे एमआयडीसी अधिकारी व महसुल विभागाला देत असल्याचे पवार यांनी सांगितले.
करार करा...अहवाल पाठवा...
विकासवाडीतील जागेवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी येणारा खर्च कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने उचलण्याचे ठरवले आहे. तेंव्हा आता जिल्हा क्रीडा कार्यालयाने असोसिएशनशी करार कऊन स्टेडियम उभारण्याच्या कामाला गती आणावी असे पवार यांनी सांगितले. तसेच पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी विकासवाडीतील जागेबाबतचा अहवाल तातडीने संबंधित विभागांकडे पाठवावा, अशी सूचनाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना अजित पवार यांनी केली.
क्रिकेट स्टेडियमसाठीच्या 35 वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश
उपमुख्यमंत्री पवार यांनी 30 एकर जागा कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे हस्तांतरीत करण्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले निर्देश, संबंधीत जागा करवीर तालुक्यातील विकासवाडीतील, माजी खासदार संभाजीराजेंच्या पाठपुराव्याला यश