कोल्हापूरसह राज्यतील 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट ? भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भुमिकेवर लक्ष
मतदारसंघातील लोकांची विद्यमान खासदारांवर असलेली नाराजी आणि त्यासंबंधीचा सर्वे यांचा धाक दाखवत राज्यातील 5 जागांवरिल विद्यमान खासदार बदलण्याचा आग्रह भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे गटावर केला आहे. भाजपच्या या मागणीवर कोल्हापूरातील दोन्ही विद्यमान खासदार आणि स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यामुळे जागावाटपाच्या निर्णयावर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील तणाव वाढणार असल्याची चिन्हे पहायला मिळत आहेत. भाजप हातकणंगले मतदारसंघातून खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट करून आमदार विनय कोरे यांना तर कोल्हापूरातून संजय मंडलिक यांना डावलून समरजीत घाटगे किंवा खासदार धनंजय महाडीक यांना तिकिट देण्याचा विचार करत आहे.
शिवसेनेतील उभ्या दुफळीनंतर राज्यातील अनेक आमदार आणि खासदारांनी एकऩाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंद केले. एकनाथ शिंदे यांना पाठींबा देताना मंत्रीपदाची तसेच येत्या निवडणूकांसाठी तिकिटाचे आश्वासनही शिंदे गटाकडून घेतले होते. शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर विद्यमान खासदारासह काही माजी खासदारांनी सुद्धा एखनाथ शिंदे यांच्या कडे उमेदवारी मागितली आहे.
लोकसभेसाठी महायुतीमध्ये जागावाटपाच्या बैठका झाल्या असून भाजपचे केंद्रिय नेते अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना महायुतीसाठी जागावाटपाचे सुत्र दिले.जागावाटपाच्या चर्चा पुढे जात असतानाच भाजपने महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या 5 जागा बदलण्याचा आग्रह धरला आहे. यामागे भाजपने मतदार संघातील खासदारांच्या सर्वेचं कारण असून या सर्वेक्षणात शिंदे गटाच्या पाच खासदारांना मोठा फटका बसणार असल्याचं दिसून आलं आहे. या मतदारसंघामध्ये ठाणे, नाशिक, बुलढाणा यासह कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघ कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांचा समावेश आहे.
भाजपच्या या मागणीमुळे एकनाथ शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून स्वता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाखुष असल्याचं कळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर मतदारसंघात मोठी तयारी केली असून गेल्या महिनाभरात ते अनेक कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरात येत आहेत.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर जागेसाठी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांच्यासह राज्यसभेचे खासदार धनंजय महाडीक यांना निवडणूकांसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर हातकणंगले मतदारसंघातून डॉ. विनय कोरे यांचाही विचार होत असून त्यासाठी त्यांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार तयारी सुरू केली असल्याचं सांगितलं जात आहे.