शाहू छत्रपतींसोबत 228 नगरसेवक; 18 माजी महापौरांचा सहभाग : शाहू छत्रपतींना विजयी करण्याचा निर्धार
शाहू छत्रपतींकडून जुन्या आठवणींना उजाळा
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीत माजी नगरसेवकांना महत्व आले आहे. दोन दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना 105 माजी नगरसेवकांनी पाठींबा दिला. तर बुधवारी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी न्यू पॅलेस येथे माजी नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी तब्बल 228 माजी नगरसेवकांनी शाहू छत्रपतींसोबत असल्याचे जाहीर केले. यामध्ये 18 माजी महापौरांचा समावेश होता. देशातील हुकुमशाही कारभार परतावून लावण्याची लढाई कोल्हापूरातून सुरू होत असून शाहू छत्रपतींना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक रामचंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी महापौर आर.के पोवार, अॅङ महादेवराव आडगुळे, रामभाऊ फाळके, कांचन कवाळे, भीमराव पोवार, मारुतराव कातवरे, सई खराडे, सागर चव्हाण, वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, प्रतिभा नाईकनवरे, वैशाली डकरे, अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे, अॅड. सुरमंजिरी लाटकर, शोभा बोंद्रे, निलोफर आजरेकर यांच्यासह 228 माजी नगरसेवक उपस्थित होते.
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायचे असून विकासातील कोणत्या मुद्यांना प्राधान्य द्यायचे यासाठी नगरसेवकांचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे. नगरसेवकांनी प्रभागात भरपूर कामे केली असून त्यातील एकादे काम राहिले असेल तर त्याचा पाठपुरावा केला जाईल. यावेळी राजू लाटकर यांनी विरोधकांकडून चुकीचा प्रचार होत असून त्यांना शहरातून मताधिक्य देवून कोल्हापूरी हिसका दाखवू.असे सांगितले. माजी उपमहापौर प्रार्थना समर्थ यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनील मोदी यांनी प्रास्ताविक केले.
शाहू छत्रपतींनी सांगितल्या नगरसेवकांच्या आठवणी
शाहू छत्रपतींनी माजी महापौर रामभाउ फाळके, अॅड.महादेवराव आडगुळे, आर.के. पोवार, सई खराडे, निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर सुशीला उर्फ माई रेडेकर यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी सांगितल्या. यामध्ये अॅङ आडगुळे यांच्या कारकीर्दीत कोल्हापूरात महापौर परिषद झाली होती. शिवाजी पेठेत भेटल्यानंतर सई खराडे यांनी राजीनामा न देता अडीच वर्षे महापौरावर कायम रहावे, असा सल्ला मीच दिला होता असे सांगता एकच हश्शा पिकल्या. माजी उपमहापौर माई रेडेकर यांच्याजवळ जात त्यांची विचारपूस केली. फुटबॉलमधील भांडणे बंद करण्याची जबाबदारी माजी नगरसेवकांना विनायक फाळके यांनी पार पाडावी, अशी सूचनाही शाहू छत्रपतींनी केली.
रामभाऊ फाळकेंची उपस्थिती आणि थेटपाईपलाईनची चर्चा
तब्बल 28 वर्षानंतर सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या रामभाऊ फाळके यांनी कोल्हापूरच्या पाणीप्रश्नांवर राजीनामा दिला होता अशी आठवण सांगत शाहू छत्रपती यांनी त्यांचे काम सतेज पाटील यांनी पूर्ण केल्याचेही अवर्जुन सांगितले.
आई-वडील महाविकास आघाडीकडे मुलगा महायुतीकडे
माजी नगरसेवकांच्या मेळाव्यामध्ये आई-वडील महाविकास आघाडीकडे आणि मुलगा महायुतीकडे तर पती महायुतीकडे आणि पत्नी महाविकास आघाडीकडे असेही चित्र पाहण्यास मिळाले.
मी शाहू विचाराच्या बरोबर...
न्यू पॅलेस येथे मेळाव्यास्थळी एक फलक लावले आहे. यावर मी शाहू विचाराच्या बरोबर असे लिहिलेले आहे. यावर मेळाव्या उपस्थित सर्व माजी नगरसेवकांनी सह्या करत ंशाहू छत्रपतींना पाठींबा दिला.