विकासाच्या हिंदुत्वासाठी जनतेने आपल्या पाठीशी राहावे; खासदार मंडलिक यांचे आवाहन
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई 'मिसळ पे' चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभा राहणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिह्यात जन्म घेणारी प्रत्येक व्यक्ती शाहूंच्या पुरोगामी विचारांची असते, त्यामुळे विकासाचे हिंदुत्व घेऊन जिह्याच्या विकासासाठी आपण लोकसभा निवडणुकीत उतरलो आहे, त्यामुळे जनतेने आपल्या पाठीशी उभा राहावे, असे आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी केले.
कळंबा (ता. करवीर) येथील अमृतसिद्धी सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केलेल्या मिसळपे चर्चा या कार्यक्रमात खासदार मंडलिक बोलत होते.
मंडलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक कल्याणकारी योजना राबवल्याचे सांगून या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्याचे ते म्हणाले. जलजीवन मिशन योजनेद्वारे संपूर्ण देशभरात पिण्याचे पाणी योजना पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रचार यंत्रणा समन्वयाने राबवावी यासाठी मिसळपे चर्चा आयोजित केल्याचे सांगून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे सांगितले. प्रत्येक शेतकऱ्याला केंद्र सरकारचे 6 हजार व राज्य सरकारचे 6 हजार असे 12 हजार रुपये मिळत आहेत. मोफत धान्य, आयुष्यमान कार्ड योजना राबवण्याबरोबरच जिह्यात दळणवळण, रस्ते, रेल्वे आणि विमानतळ अशा अनेक विकासाच्या योजना झाल्याचे ते म्हणाले. करवीर तालुक्यातून चांगले मताधिक्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
माजी आमदार अमल महाडिक यांनी निवडणूक प्रचार यंत्रणा ताकतीने राबवण्याची ग्वाही दिली.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तम कांबळे यांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक यांना संसदेत पाठवावे, असे आवाहन केले.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम सुरू केले आहे आणि करवीरमधून चांगले मताधिक्य घेऊ, अशी ग्वाही दिली.
स्वागत गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके यांनी केले.यावेळी हंबीरराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष के.एस. चौगुले, हंबीरराव पाटील, मारुतराव परितकर,पन्हाळा अध्यक्ष मंदार परितकर, भाजपा युवा मोर्चाचे डॉ. अजय चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष मधुकर जांभळे, करवीर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देसाई,पन्हाळा तालुका अध्यक्ष संतोष धुमाळ, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय पाटील -खुपिरे, अजित पाटील- परितेकर, करवीर तालुका अध्यक्ष कृष्णात पोवार, पन्हाळा तालुका अध्यक्ष अरुण पाटील, गगनबावडा तालुका अध्यक्ष तानाजी काटे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, बाजीराव पाटील- वडणगे, देवराज नरके, तसेच करवीर, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यातील भाजपा, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते...