For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभेच्या मैदानातही ‘सतेज’ रणनितीचा विजय! मोदी लाटेतही श्रीमंत शाहू छत्रपतींना लावला विजयी गुलाल

08:32 PM Jun 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
लोकसभेच्या मैदानातही ‘सतेज’ रणनितीचा विजय  मोदी लाटेतही श्रीमंत शाहू छत्रपतींना लावला विजयी गुलाल
Kolhapur Congress Satej Patil LokSabha Shahu Chhatrapati victory
Advertisement

मोदी,शहा यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या जोडण्या ठरवल्या फोल; कोल्हापूरकरांनी दिला महाराजांना बहुमान

कृष्णात चौगले कोल्हापूर

महाविकास आघाडीमध्ये यापूर्वी शिवसेनेकडे असणारा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्याबरोबरच श्रीमंत शाहू छत्रपती यांना विजयी गुलाल लावण्यामध्ये काँग्रेसचे जिह्याचे नेते आमदार सतेज पाटील यशस्वी ठरले आहेत. महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरात भव्य सभा घेऊन मला पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी दोघांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कोल्हापुरात येऊन जोडण्या लावल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर प्रचारासाठी कोल्हापुरात आठ दिवस तळ ठोकला होता. पण आमदार पाटील यांच्या ‘सतेज’ रणनितीपुढे महायुतीच्या मातब्बर नेत्यांना हार मानावी लागली आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मावळते खासदार संजय मंडलिक यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून प्रबळ उमेदवार कोण असणार ? याबाबत मोठी उत्सुकता होती. याबाबत त्यावेळी आमदार सतेज पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचा ‘सरप्राईज’ उमेदवार असेल असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर मात्र निवडणुकीतील चित्र बदलले. त्यांनी सर्वप्रथम शाहू छत्रपती यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारात घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. प्रचारामध्ये दत्तक वारसपत्रापासून सुरु झालेला आरोप राजवर्धन कदमबांडे यांच्या आपणच राजर्षी शाहू महाराजांचे रक्तांचे वारसदार आहोत या विधानापर्यंत येऊन पोहोचला. महाराजांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करून ते जनतेच्या संपर्कात राहू शकणार नाहीत असा सूरही महायुतीच्या नेत्यांकडून आळवला गेला. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती हेच राजर्षी शाहूंच्या विचाराचे आणि रक्ताचे वारसदार असल्याचे स्पष्ट करून जनतेच्या कामासाठी प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क कार्यालय सुरु करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी प्रचारातून मांडले आणि बिंबवले. मतदारसंघातील 900 गावांमध्ये राजवाड्याच्या कुटूंबातील कोणताही एक सदस्य पोहोचला पाहिजे असे त्यांनी प्रचाराचे नियोजन केले होते आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही केली. तसेच प्रचारसभा, कोपरा सभा, मेळावे याचे परफेक्ट नियोजन करून त्यानुसार कार्यवाही केली.

सतेज पाटील यांच्या जोडण्या ठरल्या यशस्वी
लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीतच आमदार सतेज पाटील यांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघात लावलेल्या जोडण्या यशस्वी ठरल्या. कोल्हापूर मतदारसंघात गडहिंग्लजमधून आप्पी पाटील, राधानगरीतून ए.वाय.पाटील यांच्या हातात काँग्रेसचा झेंडा देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे मिळून सुमारे 60 हजारांहून अधिक मतदान श्रीमंत शाहू छत्रपतींच्या पारड्यात पडले. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले उमेदवार गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. पण आमदार सतेज पाटील यांनी त्यांची मनधरणी करून पाठींबा मिळवला. गडहिंग्लजमधील जनता दलाच्या स्वाती कोरी यांनाही महाविकास आघाडीसोबत घेऊन महाराजांचे पारडे अधिक जड केले. राधानगरीचे माजी आमदार के.पी.पाटील हे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात दिसत असले तरी त्यांनी मतदानापूर्वी दोन दिवसांत आपल्या भूमिकेत बदल करून हातात ‘हात’ दिल्याचे स्पष्ट झाले. या घडामोडींमागेही आमदार सतेज पाटील यांची रणनिती दिसून येते. संजय मंडलिक यांना कागल आणि चंदगडमधून मताधिक्य मिळेल असे प्रथमदर्शनी चित्र होते. पण त्या दोन मतदारसंघातील मंडलिक यांचे मताधिक्य कमी करण्यामध्ये आमदार पाटील यांनी केलेली चाल यशस्वी ठरली. त्यामुळे पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत महाराज आघाडीवर असल्याचे चित्र होते.

Advertisement

‘सतेज’ नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब
2019 च्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली. आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन आशा पल्लवीत झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून सुऊ असलेली काँग्रेसची ‘सतेज’ घोडदोड आजतागायत कायम राहिली आहे. जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांच्या कामाला पक्षीय पातळीवर अधिकच ताकद मिळाली. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे चार आमदार झाले. तर शिक्षक मतदार संघामध्येही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर विजयी मोहोर उमटवून आपण ‘किंगमेकर’ असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीमध्येही कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करून त्यानी आपल्या राज्यव्यापी सक्षम नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

Advertisement
Tags :

.