Kolhapur Collector Office: जिल्हाधिकारी कार्यालय होत आहे हायटेक
विशेष म्हणजे तळमजल्यावरील या कार्यालयामध्ये पूराचे पाणी येते
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासह लगत असणाऱ्या विविध विभागांचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हायटेक यंत्रणाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे तळमजल्यावरील या कार्यालयामध्ये पूराचे पाणी येते. याचा विचार करून अधिकाऱ्यांच्या केबिन, स्टाफ केबिनसाठी लाकडाचा वापर केला नसून फायबर साहित्ये वापरले गेले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. तळमजल्यावरील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयालगत असणाऱ्या गृहविभाग, आस्थापना, जमीन, गावठाण, नागपूर ऑडिट, प्रोटोकॉल विभागाचे नूतनीकरण करण्यात येत आहे.
याच ठिकाणी महसूल तहसीलदार, अप्पर चिटणीस, गृह नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार यांच्या केबिनचाही नूतनीकरणाच्या कामात समावेश आहे. महापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर पूराचे पाणी आले होते.
प्रशासनाने नूतनीकरणाचे काम करताना याचा विचार करूनच कामे केली आहेत. सर्व साहित्य फायबरचे आहे. अधिकाऱ्यांच्या केबिनही फायबरच्याच करण्यात आल्या आहेत. पूराच्या पाण्यात नुकसान होणार नाही याची दक्षता घेतल्याचे दिसत आहे.
शेंडा पार्कमधील इमारतीला मूहुर्त केव्हा?
शेंडा पार्क येथे जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर इमारत उभारली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत इतर असणारी कार्यालय एकाच छताखाली आणण्याचे नियोजन आहे.