शाहू महाराजांचा सन्मानच राखायचा होता तर त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही ? संजय मंडलिकांचा महाविकास आघाडीला सवाल
शाहू महाराजांना निवडणूकीमध्ये उतरवून त्यांचा अपमान करण्याचं कारस्थान काही लोकांकडून चाललं आहे. अशी टिका करताना महाराजांच्या एवढाच सन्मान करायचा होता तर त्यांना राज्यसभेवर का निवडून दिलं नाही असा थेट सवाल महायुतीचे कोल्हापूर मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी यांनी केला आहेत. आपल्याला उभं राहायचं नव्हतं म्हणून महाराजांना उभ करून त्यांना गावोगावी फिरायला लावणं हा राजघराण्याचा अपमानच असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर कोल्हापूरातील दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्या.पण दोन्ही जागापैकी एक जागा भाजपला जाईल असे वाटत असताना महायुतीमध्ये जैसे थे परिस्थिती राहीली.
आज संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली.या सभेमध्ये बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली. शाहू महाराज छत्रपतींना विनाकारण राजकारणात ओवून त्यांचा अनादर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "कोल्हापूरात सध्या एका बाजूला विकासाकडे जाणारी व्यवस्था उभी राहीली आहे. तर दुसऱ्या बाजूला पुराणकाळात जाणारी यंत्रणा काम करत आहे. लोकसभेसाठी शाहू महाराज यांच्या विरोधात आपली लढत होणार आहे. आम्हाला त्यांच्यावर टिका करायची नाही. काहींना लोकसभा लढवायची नव्हती म्हणून शाहू महाराजांचं नाव त्यांनी गोवलं आहे. शाहू महाराजांचा सन्मानच करायचा होता तर त्यांना राज्यसभेवर बिनविरोध का पाठवलं नाही." असा थेट सवाल त्यांनी आपल्या टिकेमध्ये सतेज पाटील यांना विचारला.
पुढे बोलताना ते म्हणाले, "शाहू महाराज यांना निवडणुकीसाठी उभा करून त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका बाजूला महायुतीकडून विकासाचं राजकारण होत आहे. तर दुसऱ्या बाजूला फक्त वायफळ गप्पा मारल्या जात आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि मला दुसऱ्यांदा खासदार करण्यासाठी महायुती नक्कीच यशस्वी होईल" असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.