Breaking : धैर्यशील मानेंसाठी मुख्यमंत्र्यांकडून हातकणंगलेमध्ये राजकिय जोडण्या ? प्रकाश आवाडे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक
अभिजीत खांडेकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील सुत्रे गतीमान झाली आहेत. कालच ताराराणी पक्षातून आपली उमेदवारी जाहीर केलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असून हातकणंगले मतदारसंघात आवाडे गटाचा पाठींबा मिळवण्यासाठी राजकिय तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या या भेटीने हातकणंगले तालुक्यातील राजकिय धक्क्यांची मालिका थांबलेली नाही.
राज्यभरात हातकणंगले तालुका चर्चीला जात आहे. मुख्यता राजू शेट्टी आणि धैर्यशील माने या पारंपारिक विरोधकांच्या लढतीमुळे संपुर्ण जिल्हातील लोकांचे लक्ष वेधून घेतले असतानाच महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांनीही शड्डू ठोकल्याने ही लढत रंगतदार झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी केलेल्या दौऱ्यानंतर राजकिय चक्रे एका रात्रीत गतीमान झाली. आणि दुसऱ्याच दिवशी इचलकरंजी विधानसभेचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रस्थापीत उमेदवारांना आव्हान देत आपली उमेदवारी जाहीर केली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, माहितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री आढावा बैठक घेत आहेत . याचं पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी हातकणंगले मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवारी धैर्यशील माने यांच्यासाठी राजकिय जोडण्या लावण्यासाठी ही भेट झाल्याचं सुत्रांकडून कळत आहे.
हातकणंगले मतदारसंघात माने आणि आवाडे या गटाचं विळ्या भोपळ्याचं नातं असून मानें यांना महायुतीचं तिकिट मिळालं आहे. यापुर्वीच आवाडे गटाने खासदार बदला...ही मागणी केल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी आपली उमेदवारी करून आपली नाराजी उघड केली आहे. त्यामुळे आवाडे गटाची मनधरणी करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आवाडे यांची भेट घेतली असल्याचं राजकिय जाणकारांकडून समजत आहे. या भेटीत प्रकाश आवाडे मदतीच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांकडून कोणता शब्द घेणार आहेत हे अजून स्पष्ट झालं नाही.