For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुसंपादन झाले पण अद्याप शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही; रिंगरोडमुळे होणाऱ्या गैरसौईमुळे शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

05:51 PM Aug 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
भुसंपादन झाले पण अद्याप शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही  रिंगरोडमुळे होणाऱ्या गैरसौईमुळे शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
Advertisement

महे येथील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

कसबा बीड/ वार्ताहर

करवीर तालुक्यातील महे येथील गेल्या सात वर्षांपासून महे ते वाशी रिंग रोड चे काम रखडले आहे. 88 किलोमीटरच्या रिंग रोडला 357 कोटी रुपये खर्चासह 6 फेबवारी 2017 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. सध्या रस्त्याच्या कामासाठी 17 कोटी रुपये तर भूसंपादनास 20 कोटी असा एकूण 37 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. प्रामुख्याने विकासवाडी, टोप ते नागाव, महे, नंदवाळ, वाशी, गिरगाव या ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न गंभीर बनल्याने रिंग रोड रखडला आहे. शेतकऱ्यांनी जमीन दिली आहे. नुकसान भरपाई मिळाली नाही. उलट जमिन भूसंपादन केल्याने पडून आहे. त्यामुळे या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Advertisement

भविष्यात कोल्हापूर शहरावरील वाहतूकीचा ताण कमी होण्यासाठी युती शासनाच्या काळात २०१७ ला हा रिंग रोड प्रस्तावित केला होता. जाजल पेट्रोल पंप (पुणे बंगलोर हायवे), गिरगाव, नंदवाळ, वाशी, महे असा रोड प्रस्तावित आहे. पुढे हा रोड कोगे, कुडित्रे फॅक्टरी, वाकरे फाटा, खुपिरे, यवलूज, वरणगे, केर्ली, टोप असा होणार आहे. बहुतांशी ठिकाणी रोड चे काम पुर्ण झाले आहे. तर कांही ठिकाणी जमिनीवर नंबरिंग करून जमीन भूसंपादन केली आहे. पण या रोड साठी लोकप्रतिनिधी व शासन स्तरावर नेहमी अनास्था दिसून आली आहे.

महे येथील शेतकऱ्यांचे या रस्त्याअभावी अतोनात हाल सुरू आहेत. कोगे गावाकडील बाजूने पाचशे मिटरचा रस्ता नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी अडवला आहे. त्यामुळे महे व वाशी शिवारातील ऊस कुंभी कासारी साखर कारखान्याला नेण्यासाठी वाशी, शेळकेवाडी, जरगवाडी, महे असा दहा ते बारा किलोमीटर अंतरावरून जावे लागते. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे रिंग रोड झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठी असणार्‍या रिंग रोडसाठी 357 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून 37 कोटी रुपये उपलब्ध करून दिला. एरवी निधी नाही म्हणून ओरड करणार्‍या यंत्रणेला निधी मिळूनही गेल्या अनेक वर्षांपासून भूसंपादन करता आले नाही. शहरातील वाहतुकीचा ताण वाढत असताना आणि वेग मंदावत असताना झालेले दुर्लक्ष अक्षम्य आहे. आता तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे पाहणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

भूसंपादन महत्त्वाचे पण प्रशासकीय उदासीन
कणेरी, गिरगाव, खुपिरे या गावांसाठी बाह्यवळण आखणी करून भूसंपादन करणे, हालसवडे ते विकासवाडी रस्ता जोडणे ही कामे रेंगाळली आहेत. काही ठिकाणी रिंग रोडचे 18 फुटांनी रुंदीकरण करण्यात आले आहे. कागल येथील जाजल पेट्रोल पंप ते शेळेवाडी मार्गावरील कामे पूर्ण आहेत. कोल्हापूर-परिते रस्ता रुंदीकरणही पूर्ण असून कोगे, कुडित्रे, गगनबावडा रस्ता या मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. हालसवडे ते विकासवाडी हा अडीच कि.मी.चा नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन आवश्यक आहे. मात्र ते झाले नाही.

या रिंग रोडमुळे कर्नाटकातून कोकणात जाणारी व येणारी वाहतूक जाजल पेट्रोल पंप, कणेरीवाडी, गिरगाव, कात्यायनी, नंदवाळ, वाशी, महे, कोगे, कुडित्रे फॅक्टरीमार्गे ये-जा करू शकतील. याच मार्गावरून शाहूवाडीहून येणारी वाहतूकही वळविता येणार आहे. तसेच पुणे-सांगली या मार्गावरून कोकणात येणारी व जाणारी वाहतूक नागावमार्गे रिंग रोडने होणार शकेल. शहरात येणारी अवजड वाहने आणि कोकणात जाणारी सर्व वाहने थेट शहरात न येता रिंग रोडने जाणार आहेत. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

वाहतुकीची कोंडी कमी होण्यासाठी प्रयत्न आवश्यक
कोल्हापूर हे शैक्षणिक, औद्योगिक, व्यापार केंद्र आहे. त्याबरोबरच अंबाबाई दर्शनासाठी बाहेरून येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. यामुळे शहरातील वाहतूक वाढत असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन त्याचा वेग मंदावत आहे. कर्नाटकातून गगनबावडा आणि शाहूवाडीमार्गे कोकणात जाणार्‍या-येणार्‍या वाहनांना शहरातूनच ये-जा करावी लागते. शाहूवाडी भागातून बॉक्साईट वाहतूक थेट शहरातून होत असल्याने अवजड वाहनांची वर्दळ असते. सातारा, सांगली, सोलापूर या भागातून दख्खनचा राजा जोतिबा दर्शनासाठी आणि कोकणात जाण्यासाठी शहरातूनच जावे लागते. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीची वर्दळ कमी करण्यासाठी रिंग रोडची गरज आहे. या आंदोलनासाठी माजी उपमहापौर विक्रम जरग, सरदार पाटील, बाजीराव पाटील, सर्जेराव पाटील, सदाशिव पाटील (महे), वाशी येथील उत्तम पाटील, अरूण मोरे, उत्तम लाटकर, सचिन पाटील, प्रदीप पाटील, शंकर पाटील, संतोष पाटील (कोगे) यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.