नव्या पिढीसमोर रेडयाची जुनी टक्कर...सागर माळावर उभे रहात आहे मोठे शिल्प
सुधाकर काशीद कोल्हापूर
या परिसराचे मूळ नाव रेड्याच्या टकरीचा माळ. सागर देवाचे मंदिर म्हणून त्याला सागराचा माळ असेही ओळखले जायचे. एवढा विस्तीर्ण की, त्या काळात तिथे रेड्याच्या टकरीचा खेळ रंगायचा. टकरीत बिथरलेला रेडा स्राया माळावर पळत सुटायचा माळ एवढा मोठा की माळावरच पळून पळून दमायचा. या माळावर वस्ती नाही पण स्राया कोल्हापुरातल्या म्हशी या माळावर चरायला यायच्या .माळावर रेड्याच्या टकरी लावल्या जायच्या.त्यामुळे या माळावर रेड्याच्या टकरीचे एक छोटीसे शिल्प होते . आता टकरी बंद झाल्या .पण शिल्प तेथे कायम राहिले .पण या शिल्पाला आता पुन्हा नवा उजाळा मिळत आहे . रेडा आकाराने जेवढा मोठा आणि जेवढा बलदंड असतो तेवढ्याच आकाराचे रेड्याच्या इर्षेबाज टकरीचे नवे शिल्प तेथे उभे राहत आहे.त्यामुळे रेड्याच्या टकरीचा माळ पुन्हा नव्या पिढीसमोर आपली जुनी ओळख घेऊन येत आहे.
कोल्हापूर शहराच्या पूर्वेस आता प्रतिभा नगर म्हणून जी वसाहत आहे त्या वसाहतीचा मूळ परिसर म्हणजे रेड्याच्या टकरीचा माळ .1940 पर्यंत या परिसरात वस्तीच नव्हती. या माळावर उभे राहिले की नजर जिथे पोहोचेल ते थपर्यंत माळच पसरलेला दिसायचा .1946 च्या काळात कोल्हापुरात सहकारी गृहनिर्माण संस्थेचा प्रयोग सुरू झाला .व पी सी पाटील थोरात आणि जेपी नाईक यांच्या पुढाकाराने सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी माळावर काही जागा देण्यात आली .एक आणा चौरस फूट दराने जमिनीचे 200 ,जमीन विकासासाठी 200 व सदस्यत्वाचे शंभर रुपये अशा पाचशे रुपयात तेव्हा जागा मिळत होती .त्यामुळे काहीजण एकत्रित आले . त्यात डॉक्टर वकील साहित्यिक प्राध्यापक शिक्षक अशी मंडळी होती . उल्लेखच करायचा झाला तर ग. दि. माडगूळकर, डॉक्टर श्री श्रीमाळ, सुधीर फडके , सबनीस ,आजीजुद्दीन खा साहेब ,वि स खांडेकर ,डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे डॉक्टर कित्तूर अशी प्रतिभावान मंडळी होती .आणि त्यातूनच प्रतिभा नगरात प्रतिभावंतांची घरे उभी राहू लागली .
या परिसरात वि .स . खांडेकर महापालिकेच्या शाळा मैदानात गुराख्यांचा देव म्हणजे सागराचे मंदिर आहे .तेथेच रेड्याच्या टकरीचे प्रतीकात्मक शिल्प आहे .या माळावर आपल्या म्हशी चारायला घेऊन शहरातील गवळी व्यावसायिक यायचे .दीपावली पाडव्याला सजलेल्या म्हशींची रेड्यांची मिरवणूक काढायचे आणि इर्षेपोटी रेड्यांच्या टकरी लावायचे . कारण रेडा पोसणे म्हणजे एक वेगळे स्टेटस कोल्हापुरात मानले जात होते .
टकरीच्या केवळ स्मृती आहेत टकरी बंद झाल्या आहेत . पण रेड्याच्या टकरीचे एक मोठे शिल्प नव्याने उभारले जात आहे .सार्वजनिक बांधकाम विभाग हे शिल्प उभारणार आहे .आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव यांनी प्रत्येकी 15 लाखाचा निधी त्यासाठी दिला आहे .सामाजिक कार्यकर्ते व मशीन पालनाचा व्यवसाय करणारे काका पाटील यांनी पुतळा उभारणीत पुढाकार घेतला आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नंदीवाले ,राजू वारके यांच्याकडे शिल्पाच्या उभारणीची जबाबदारी आहे . तरुण शिल्पकार ललित महेश डोंगरसाने ब्राँझच्या या शिल्पाची उभारणी करत आहेत . त्यामुळे येत्या दीपावली पर्यंत या माळावर पुन्हा रेड्याची टक्कर शिल्परूपात सर्वांना पाहायला मिळणार आहे.