For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर होईल, भूषण गवई यांची ग्वाही

12:24 PM Aug 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर होईल  भूषण गवई यांची ग्वाही
Advertisement

कोल्हापूर सर्किट बेंच मंजूर करण्यासाठी मला योगदान देता आले हे माझे भाग्य

Advertisement

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे रविवारी दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले. कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर होईल, अशी ग्वाही यावेळी भूषण गवई यांनी दिली.

तसेच कोल्हापूर सर्किट बेंच मंजूर करण्यासाठी मला योगदान देता आले हे माझे भाग्य असून, यामुळे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारांची परतफेड करण्याची संधी मिळाल्याची भावनाही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली.

Advertisement

यानंतर मेरी वेदर ग्राऊंडवर सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र तसेच राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा देऊन सत्कार केला. या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती प्रमुख उपस्थित होते.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी पाईक राहूनच आजपर्यंत देशसेवा आणि सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासले आहे. कोल्हापूर सर्किट बेंच मंजूर करताना वकिलांचा नाही तर सहा जिह्यातील शेवटच्या नागरिकाला कशा पद्धतीने न्याय देता येईल हाच विचार आपल्या डोक्यात होता, असे भूषण गवई यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्याचे काम कोल्हापूर सर्किट बेंच करेल, असा विश्वास गवई यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरला खंडपीठ मंजूर झाल्यानंतरही टीका करण्यात आली होती, मात्र याच खंडपीठाने 1 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, 4 मुख्य न्यायाधीश तयार केले आहेत.

आता अशाच पद्धतीने कोल्हापूर सर्किट बेंच न्यायमूर्तींसह वकीलांसाठीही संधी निर्माण करेल, असा विश्वास गवई यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये सुरु झाल्याने कोल्हापूर आता विकासाच्या सेंटर स्टेजला आले आहे.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यातील नागरिकांच्या केंद्रस्थानी कोल्हापूर राहणार आहे. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे दालन उघडले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, करवीर नगरीला न्यायव्यवस्थेचा गौरवशाली इतिहास आहे. आज त्याच करवीर नगरीत न्यायाचे मंदिर सुरु होत आहे. न्यायासाठी शेकडो मैलाचा प्रवास आता घरात आला आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठीचा प्रवास, वेळ, खर्च वाचणार असून न्यायप्रक्रिया गतिमान होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे म्हणाले, कोल्हापूर सर्किट बेंच म्हणजे नुसते नवीन कोर्टाचे उद्घाटन नसून न्यायपर्वाच्या नवीन युगाची सुरुवात होत आहे. नवीन वकिलांना आता काम करण्याची खूप संधी असल्याचे प्रतिपादन केले.

न्यायमूर्ती मकरंद कर्णिक म्हणाले, सर्किट बेंचमुळे न्यायाचा हक्क दारी आला असून, लोकशाही सशक्त होण्यास मदत होणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांचे योगदान कोणीही विसरु शकणार नाही.

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल सदस्य संग्राम देसाई म्हणाले, सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्किट बेंच मंजूर करुन दिले आहे. मात्र आता सामान्य पक्षकाराला जलद आणी स्वस्त न्याय मिळवून देण्याची आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे चेअरमन अमोल सावंत म्हणाले, कोल्हापूर सर्किट बेंचमुळे न्यायव्यवस्थेचे विक्रेंद्रीकरण झाले असून, पक्षकारांना जलद व स्वस्त न्याय मिळण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने जादा बोलणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर असताना मी दहा मिनिटांच्या वर बोलत नाही. मात्र कोल्हापूरकरांनी दोन दिवसात दिलेल्या मानसन्मानाने मी भारावून गेलो आहे. समोर असलेली गर्दी आणि उत्साह पाहून मला बोलण्याचा मोह आवरत नाही.

27 एकर जमिनीचे हस्तांतरण

सर्किट बेंचच्या इमारतीसाठी शेंडापार्कातील 27 एकर जमिनीचे हस्तांतरण जिल्हा प्रशासनाने केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे यांच्याकडे आदेशाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केली.

या जमिनीची किंमत 68 कोटी रुपये 58 लाख आहे. ती मोफत दिली. उच्च न्यायालयाकडून इमारतीचा आराखडा येताच बांधकामासाठीच्या निधीची तरतूद करुन इमारत पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

सरन्यायाधीश भावूक

राजर्षी शाहू महाराज यांचा जीवनपट आणि सामाजिक कार्याची महती सांगणारा पोवाडा शाहीर आझाद नायकवडी यांनी सादर केला. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन होत असल्याबद्दल शाहिरांनी या पोवाड्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कवनातून नामोल्लेख केला. शाहू महाराज यांच्या पोवाड्यात आपल्या नावाचा उल्लेख ऐकून भूषण गवई भावूक झाले.

राजर्षी शाहू महाराजांचा मंत्र भूषण गवई म्हणाले, आपल्याला मिळालेला अधिकार हा समाजातील गोरगरीबांच्या उध्दारासाठी आहे, हे राजर्षी शाहू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. पद हे नियतीने देशाची, समाजाची सेवा करण्याची दिलेली संधी आहे. या पध्दतीनेच मी मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. हाच कानमंत्र जिथे जाईल तिथे आवर्जून सांगतो.

मी आता नाही बोललो तर माझ्याशीच प्रतारणा केल्यासारखे होईल. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या परवानगीने मी जादा बोलणार आहे, त्यांची परवानगी घेतली आहे, असे भूषण गवई यांनी सांगताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडत हसून दाद दिली.

१४ मान्यवरांचा सत्कार

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक अराधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, विधी व न्यायविभागाचे सचिव विलास गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजी येथील अॅड. प्रिती प्रकाश पटवा, बांधकाम व्यावसायिक अनिकेत जाधव कसबेकर, निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे, निवृत्त न्यायमूर्ती रणजीत मोरे, निवृत्त न्यायमूर्ती मोहित शहा यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement
Tags :

.