Kolhapur Circuit Bench तुमच्यामुळे पूर्णत्वास, सतेज पाटलांनी गवईंचे मानले आभार
आमदार सतेज पाटील यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आभार मानले
कोल्हापूर : 42 वर्षांपासून कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील वकील, पक्षकार व नागरिकांचा सर्किट बेंचसाठी लढा सुरु होता. मात्र, चार दशकांच्या या लढ्याची स्वप्नपूर्ती तुमच्यामुळे रविवारी बघायला मिळाली, अशा शब्दांत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आभार मानले.
कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर केल्याबद्दल आमदार पाटील यांनी गवई यांचा सर्किट हाऊसवर सत्कार केला. यावेळी आमदार पाटील यांनी सर्किट बेंचसाठी कोल्हापूरसह सहाही जिह्यांतील वकील, पक्षकार, नागरिक व विविध संघटनांनी उभारलेल्या लढ्याची माहिती दिली. कोल्हापूरसाठी सर्किट बेंच हा जिव्हाळ्याचा विषय बनला होता.
या बेंचमुळे सहाही जिह्यातील पक्षकार आणि वकिलांचा वेळ, पैसा व शारीरिक त्रास वाचणार आहे. कोल्हापुरात सुरु झालेले सर्किट बेंच हा सुवर्णक्षण आहे, त्यामुळे प्रत्येक कोल्हापूरकर आणि सहाही जिह्यांतील नागरिक हा क्षण विसरुच शकत नाही.
गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेली ही मागणी तुमच्या प्रयत्नामुळे शक्य झाली, या शब्दांत आमदार पाटील यांनी भूषण गवई यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनासाठी आलेले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची रविवारी सकाळी सर्किट हाऊसवर अनेक मान्यवरांनी भेट घेतली.
महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांनी कौतुक केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश गवईंचे शनिवारी सायंकाळी येथे आगमन झाले. शाहू जन्मस्थळाला अभिवादन करून ते सर्किट हाऊसला मुक्कामी पोहोचले. शनिवारी सायंकाळी मान्यवरांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
प्रीती प्रकाश पटवा यांचा सत्कार
प्रिती प्रकाश पटवा यांना विकलांग आले, तरीही त्यांनी हार न मानता शिवाजी विद्यापीठातून एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी एल.एल.बी., एल.एल.एम. आणि सी. ए.च्या विद्यार्थ्यांसाठी खासगी क्लासेस सुरू केले आहेत. त्यांनी 40 पेक्षा अधिक विषयांच्या नोटस् काढून त्याचे पुस्तकात रूपांतर केले. त्यांच्या या कार्याचा भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्टेजवरून खाली येत उचित सन्मान केला. तसेच त्यांच्या नोटस्च्या पुस्तकांचे प्रकाशनही केले.