Kolhapur Circuit Bench: 167 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सुमारे 30 हजार खटले
सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होणार
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे सोमवार (18 ऑगस्ट) पासून सुरु होत आहे. सीपीआर समोरील जुन्या न्यायालयाच्या हेरिटेज इमारतीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सोमवारी उच्च न्यायालयातील दोन ट्रक भरुन 20 हजार खटल्यांची कागदपत्रे सर्किट बेंचमध्ये आली आहेत. तर मंगळवारी 10 हजार खटले कोल्हापुरात वर्ग झाले आहेत.
सुमारे 30 हजारहून अधिक खटले आणि त्यासंबंधीची कागदपत्रे कोल्हापुरात दाखल झाली आहेत. दरम्यान, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी आणखीन 167 कर्मचाऱ्यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. रविवारी 24 कर्मचारी कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग करण्यात आले होते. हे कर्मचारी मंगळवारपासून हजर झाले आहेत.
दरम्यान, मंगळवारी निघालेल्या आदेशामध्ये डेप्युटी रजिस्टार, वरिष्ठ स्वीय सहाय्यक, स्वीय सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक, ऑफीस सुपरिडेंट, अस्टिटंड सुपरिडेंट, अस्टिटंट रजिस्टार, सेक्शन ऑफीसर, असिस्टंट सेक्शन ऑफीसर,लिपीक शिपाई, यांचा समावेश आहे.
1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर करण्यात आले. सोमवारपासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होणार आहे. यामध्ये दोन न्यायमूर्तींचे एक डिवीजन बेंच तर प्रत्येकी एक एक न्यायमूर्तींचे दोन बेंच असे चार न्यायमुर्ती कोल्हापूर सर्किट बेंचसाठी असणार आहेत.
सोमवारी उच्च न्यायालयातील 20 हजार खटले व त्यांची कागदपत्रे सर्किट बेंचकडे दाखल झाली आहेत. यामध्ये बहुतांशी फौजदारी खटल्यांचा समावेश आहे. मंगळवारी आणखीन 10 हजार खटले कोल्हापूर सर्किट बेंच येथे आले. मात्र या ठिकाणी सुरु असलेल्या काम आणखी जागेच्या अडचणीमुळे ही सर्व कागदपत्रे कसबा बावडा येथील न्यायसंकुलाच्या इमारतीमध्ये ठेवली आहेत.
हेरिटेज दिवे
न्याय संकुलाच्या आवारामध्ये 15 हेरिटेज दिवे बसविण्यात आले आहेत. हेरिटेज इमारतीला साजेशे असे हे दिवे असून, यामुळे इमारतीच्या सौदर्यांमध्ये भर पडली आहे. संपूर्ण इमारतीच्या आवारात हे दिवे बसविले आहेत. इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ, संरक्षक भिंतीजवळ हे दिवे बसविण्यात आले आहेत.
1 लाख 20 हजार पाण्याची क्षमता
न्यायसंकुलाच्या आवारात पाच इमारती आहेत. सर्किट बेंचच्या कामकाजासाठी 300 कर्मचारी, वकील, पक्षकार असे मिळून 5 ते 6 हजार नागरिक या इमारतीच्या आवारात दररोज येण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे इमारतीमध्ये एकाच वेळी 1 लाख 20 हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाच्या आवारामध्ये 1 बोअरही मारण्यात आले आहे.
पहिल्या मजल्यावर स्टोअर रुम
सिमेंटच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर दोन स्टोअर रुम उभारण्यात आले आहेत. एका स्टोअररुममध्ये फौजदारी खटले ठेवण्यासाठी लॉकर उभारण्यात आले आहे. तर दुसऱ्या रुममध्ये दिवाणी खटले ठेवण्यासाठी भव्य लॉकर तयार करण्यात आले आहेत. सोमवारी व मंगळवारी आलेल्या खटल्यांचे वर्गीकरण करण्याचे काम सुरु असून, ते खटले व संबंधित कागदपत्रे स्टोअररुममध्ये ठेवण्यात येणार आहेत.
दुसऱ्या मजल्यावर सिंगल बेंचच्या दोन कोर्ट रुम
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सिंगल बेंचच्या न्यायमूर्तीच्या दोन कोर्ट रुम उभारण्यात आल्या आहेत. या कोर्टरुममध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच इतर अद्ययावत सोई तयार केल्या आहेत.
191 अधिकारी, कर्मचारी
रविवारी 24 तर मंगळवारी आणखीन 167 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्ती कोल्हापूर सर्किट बेंचसाठी करण्यात आल्या. 3 डेप्युटी रजिस्टार, न्यायाधीशांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक 2, 4 स्वीय सहाय्यक, 9 पर्सनल असिस्टंट, 4 असिस्टंट रजिस्टार, 18 सेक्शन ऑफीसर्स, 28 असिस्टंट सेक्शन ऑफीसर्स, 70 लिपीक, 41 शिपाई, 1 लिफ्टमन, 1 वरिष्ठ ग्रंथपाल, 2 चोपदार, 2 स्टेनोग्राफर, 1 सॉफ्टवेअर प्रोग्रामर, 3 बायडंर्स, 2 फायलर यांचा समावेश आहे.
40 सरकारी वकीलांची व्यवस्था
जुन्या इमारतीमध्ये असणाऱ्या ग्रंथालयामध्ये 40 सरकारी वकील आणी त्यांचे लिपिक यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य सरकारी वकिलांसाठी स्वतंत्र केबीन उभारण्यात आली आहे. तसेच सरकारी वकिलांसाठी कॉन्फरन्सची व्यवस्थाही याच ठिकाणी करण्यात आली आहे.