Kolhapur Circuit Bench कडे 15 हजार खटले वर्ग, प्रशासनाकडून तयारीचा आढावा
कोल्हापूर येथे सर्किट बेंचचे कामकाज लवकरच सुरु होत आहे
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिह्यातील 60 हजार खटले मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहेत. कोल्हापूर येथे सर्किट बेंचचे कामकाज लवकरच सुरु होत आहे. मुंबई उच्च न्यायालयातील सहा जिह्यातील सुमारे 15 हजार खटले आणि त्यांची कागदपत्रे सोमवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाली.
उर्वरित खटलेही आणि त्याची कागदपत्रे लवकरच कोल्हापुरात आणण्यात येणार आहेत. दरम्यान, कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजासाठी पहिल्या टप्प्यात 24 कर्मचारीही कोल्हापूरमध्ये दाखल झाले. यामध्ये 1 डेप्युटी रजिस्टार, 1 सेक्शन ऑ फीसर, 2 असिस्टंट सेक्शन ऑ फीसर, 10 लिपीक, 10 शिपाई यांचा समावेश आहे. उर्वरित कर्मचारी याच आठवड्यामध्ये कोल्हापुरात दाखल होणार आहेत.
कोल्हापुरातील सर्किट बेंचच्या कामाला गती आली आहे. इमारतीच्या उभारणीसह प्रशासकीय हालचालींनाही वेग आला आहे. सर्किट बेंचच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. याचसोबत खटले वर्ग करणे, कर्मचारी दाखल होणे आदी घडामोडीही वेगाने होत आहेत.
24 कर्मचारी दाखल
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 160 कर्मचारी कोल्हापुरात येणार आहेत. या पैकी 24 कर्मचारी सोमवारी कोल्हापुरात दाखल झाले. यामध्ये डेप्युटी रजिस्टर संदीप भिडे, वरिष्ठ अधिकारी सचिन कांबळे, असिस्टंट सेक्शन ऑफीसर संतोष ढोबळे, संतोष भगले यांच्यासह १० लिपीक आणि १० शिपाई दाखल झाले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने रविवारी या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश लागू केले असून, त्यांना कोल्हापूर येथे तातडीने हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे सोमवारी सकाळीच हे सर्व कर्मचारी कोल्हापुरात हजर झाले.
प्रशासनाकडून पाहणी
सर्किट बेंचच्या उद्घाटनाची रुपरेषा ठरल्यानंतर सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे सर्किट बेंच इमारतीची पाहणी केली.
यामध्ये हा परिसर नो पार्किंग झोन करणे, एकेरी वाहतूक करणे यासह सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. न्यायालयाच्या आवारात जाण्यासाठी न्यायमूर्तीसाठी १ गेट राखीव ठेवण्यात येणार असून, दुसऱ्या गेटने वकील, पक्षकार यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
यासोबतच मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा यांचाही आढावा घेण्यात आला आहे. कार्यक्रमाचाही आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या. उर्वरित काम दोन दिवसात पूर्ण करणे आवश्यक असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. उद्घाटनाच्या
१५ हजार खटले वर्ग
पहिल्या टप्यात सहा जिल्ह्यातील सुमारे १५ हजार खटले वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये फौजदारी खटल्यांना प्राधान्य देण्यात आले असून, निवडणुकीसह वस्तू व सेवा कर, प्राप्तिकर अशा प्रकारचे खटले वर्ग करण्यात आले आहेत
शनिवारी खटल्यांचा बोर्ड होणार प्रसिद्ध
सोमवार, 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. सोमवारी जे खटले चालणार आहेत त्यांचा बोर्ड शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाच्या वतीने सहा जिह्यातील खटल्यांची यादी यापूर्वीच तयार केली होती. तारखेनुसार यादी करुन हे खटले कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग करण्याचे काम सुरु आहे.