ये चप्पल कौनसा है? कोल्हापुरी.., Kolhapuri Chappal चे बॉलीवूड कनेक्शन आहे तरी कसे?
चित्रपटात अनेक प्रसंगात वापरलेल्या कोल्हापुरी चप्पलची चर्चा खूप गाजली
By : इम्रान गवंडी
कोल्हापूर : 'ये चप्पल कौनसा है.... 'दादा लोग रामपुरी चाकू से काम चलाता है, लेकीन हम कोल्हापुरी चप्पलसे काम चलाता है.... असे म्हणत अमिताभबच्चन यांनी १९७९ मध्ये आलेल्या सुहाग चित्रपटामध्ये गुंडाची केलेली पिटाई आजही आठवते. चित्रपटात अनेक प्रसंगात वापरलेल्या कोल्हापुरी चप्पलची चर्चा खूप गाजली.
अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कोल्हापुरी चप्पल सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे. कोल्हापुरी चप्पल व अमिताभबच्चन यांच्या डायलॉगमुळे सुहाग चित्रपटाने चांगलाच भाव खाल्ला होता. अमिताभ यांनी कोल्हापुरी चप्पल घालून केलेल्या फायटींगने अख्खे थिएटर डोक्यावर घेतले होते.
यातून कोल्हापुरी चप्पलच्या मजबुतीचा उल्लेख केला झाला आहे. जंजीर चित्रपटात प्राण यांनी करकर असा आवाज करणारे कोल्हापुरी चप्पल घालून केलेली एन्ट्री चांगलीच गाजली. यापाठेपाठ पिंजरा या मराठी चित्रपटात अभिनेते श्रीराम लागू यांनी वापरेल्या कोल्हापुरी चप्पलचीही चांगलीच चर्चा झाली.
यावरूक पिंजरा कोल्हापुरी चप्पल अशा नावाने चप्पलही बाजारात आली होती. महाराष्ट्रातील संस्कृतीशी निगडीत असलेली पारंपरिक चामड्याची हाताने बनवलेली कोल्हापुरी चप्पलने मजबुती, सौंदर्य आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान मिळवले आहे.
यामुळे कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड देशभरात पोहोचला आणि ती एक सांस्कृतिक प्रतीक बनली. १९८० ते २००० दशकात अनेक चित्रपटात कोल्हापुरी चप्पलचा वापर झाला आहे. यामध्ये सचिन पिळगावकर यांचा नदीया के पार (१९८२), मासूम (१९८३), लगान (२००१), सलमान खानचा कौटुंबीक रोमँटीक हम आपके है कौन (१९९४), सनी देओलचा अॅक्शनपट घातक (१९९६), लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांची प्रमुख भुमिका असलेला अशी ही बनवा बनवी (१९९२), शाहरुख खानचा स्वदेस (२००४), अमिताभ, धर्मेंद्र संजीव कपुर, अमजद खान यांचा शोले (१९७५) आदी सुपरहिट चित्रटातील कोल्हापुरी चप्पल गाजले आहे.
शोले चित्रपटात जय (अमिताभबच्चन) आणि वीरू (धर्मेंद्र) यांच्यासह गावातील इतर पात्रांनी कोल्हापुरी चप्पल परिधान केलेली दिसते. विशेषत? गावकऱ्यांच्या दृश्यांमध्ये, जसे की रामगढ गावातील बाजार किंवा सामुदायिक प्रसंगांमध्ये, ही चप्पल गावातील साध्या जीवनशैलीला दर्शवते.
सिने कलाकारांना कोल्हापुरी चप्पलची भुरळ
"अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील नायकांनी कोल्हापुरी चप्पलचा वापर केला आहे. त्या चित्रपटातील व्यक्तीरेखानुसार कोल्हापुरी चप्पलची ओळख निर्माण झाली आहे. सुहाग, जंजीर, शोले या हिंदी चित्रपटासह पिंजरा सारख्या अनेक मराठी चित्रटात कोल्हापुरी चप्पलने महत्वाची भुमिका बजावली आहे."
- अनिल डोईफोडे, चप्पल व्यावसायिक, कोल्हापूर
सॉरी नो प्राडा.. माय ओरिजनल कोल्हापुरी
हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपुर-खान हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत कोल्हापुरी चप्पलचे कौतुक तर केलेच शिवाय प्राडाला चपराकही दिली. सॉरी नो प्राडा.. ही तर माझी ओरिजनल कोल्हापुरी चप्पल आहे अशा शब्दात संस्कृतीशी नाळ टिकवुन ठेवली आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या विधानावरून प्राडा दिलेल्या टोल्याने दिवसभर नेटकऱ्यांची चर्चा रंगली होती.