Kolhapur : शहराची हद्दवाढ 25 गावांना घेऊनच होणार, मात्र..., माधुरी मिसाळ काय म्हणाल्या?
त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक ही हद्दवाढ करुनच घ्यावी
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळेच शहराची हद्दवाढ ही 25 गावांना घेऊनच करायची आहे. पण ती गावे घेतल्यानंतर त्यांना सोईसुविधा कशा देणार, त्यांचा विकास कसा करणार हे महापालिकेने सांगितले पाहिजे, असे सहपालकमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या. हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
शासकीय विश्रामगृह येथे हद्दवाढ कृती समितीने मिसाळ यांची भेट घेऊन हद्दवाढीचे निवेदन सादर केले. कोल्हापूरमधील कोणीही राजकारण्यांनी हद्दवाढ कृती समितीला वेळ दिला नाही पण माधुरी मिसाळ यांनी वेळ दिल्याबद्दल हद्दवाढ कृती समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी हद्दवाढ का गरजेची आहे हे सांगितले. त्यानंतर अॅड. बाबा इंदुलकर यांनी शहरालगतच्या गावांना महापालिका देत असलेल्या सुविधा व केएमटीच्या माध्यमातून महापालिकेचा होत असलेला तोटा सांगितला. तर दिलीप देसाई यांनी हद्दवाढ करणार हे शासन आतापर्यंत सागत आहे, पण कधी करणार हे सांगत नाही.
त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक ही हद्दवाढ करुनच घ्यावी. अन्यथा कोल्हापूरची जनता या निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, असे सांगितले. यानंतर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, जशी हद्दवाढ व्हावी म्हणून तुम्ही भेटता तसेच हद्दवाढ नको म्हणून ग्रामीण भागातील लोक मला भेटले आहेत. सध्या केंद्र सरकारकडून 15 व्या वित्त आयोगामधून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे.
तो निधी आता मिळणार नाही. तसेच लोकांचे असे म्हणणे आहे की, महानगरपालिका आम्हाला शहरात घेत आहे. पण शहरात घेतल्यानंतर आम्हाला सोईसुविधा कशा पुरवणार आहेत. तसेच आमच्या ग्रामपंचायत मधील नोकरवर्गाचे काय करणार. तसेच हद्दवाढीनंतर महापालिका गावातील जागेवर आरक्षण टाकणार, अशी भीती घातली आहे.
त्यावर शासनाने कोल्हापूर महापालिकेकडून एक आराखडा मागितला आहे. त्यात हद्दवाढीत ही २५ गावे आल्यानंतर त्या गावांचा विकास महापालिकेकडून कसा करण्यात येणार आहे. किवा त्या गावातील ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांचे समायोजन कुठे करणार याचा सविस्तर अहवाल शासनाला द्यावा, असे सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष विजय जाधव, आर. के. पोवार, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, अशोक भंडारे, सुशिल भांदिगरे, अनिल कदम, किशोर घाटगे, अविनाश दिडे व भरत काळे आदी उपस्थित होते.