Rajesh Kshirsagar: 'हद्दवाढीवरून माझ्यावर होणाऱ्या राजकीय टीकांना भीक घालत नाही'
माझ्यावर टीका झाली, त्याबद्दल मी कोणालाही काही बोलणार नाही
कोल्हापूर : हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. शहरासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी हद्दवाढ महत्त्वाची आहे. हद्दवाढीसाठी निस्वार्थपणे काम करत आहे. आता हद्दवाढ अटळ असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
तसेच शहरालगतच्या आठ गावांचा समावेश करून हद्दवाढीचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे पत्र मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना दिल्याचेही आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. क्षीरसागर म्हणाले, काही दिवसांपूर्वी हद्दवाढीतील गावच्या सरपंचांची जी बैठक झाली त्यामध्ये माझ्यावर टीका झाली, त्याबद्दल मी कोणालाही काही बोलणार नाही.
शहर व ग्रामीण असा भेदभाव करणार नाही. ग्रामीण भागातील लोकांना विश्वासात घेऊन त्यांचे गैरसमज दूर करुन हद्दवाढ करायची आहे. त्या भागांचा विकास करण्याची जबाबदारी महापालिकेची अर्थात प्रशासनाची आहे. हद्दवाढीवरून माझ्यावर जी राजकीय टीका केली जाते त्याला मी भीक घालत नाही. मात्र स्वार्थासाठी काम करत आहे असे म्हणणे चुकीचे आहे, असे सांगत ते म्हणाले, गेली 80 वर्ष हद्दवाढ झाली नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, राहुल चव्हाण, राजू हुंबे, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, सुनील जाधव, महिला आघाडीच्या मंगला साळोखे, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील उपस्थित होते.
हद्दवाढीबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा हद्दवाढ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी करायची का निवडणुकीनंतर या संदर्भात राज्याचे दोन वरिष्ठ अधिकारी निवडणूक आयोगाशी चर्चा करत आहेत. ते लवकरच स्पष्ट होईल. ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील मुंबईतील बैठकीला करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक अनुपस्थित होते.
प्रत्येक लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील लोकांचे म्हणणे ऐकावे लागते. ते बैठकीला का अनुपस्थित होते, याबाबत ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील, असेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. ठराव काहीही होऊ दे हद्दवाढ होणारच मनपा आयुक्त हद्दवाढीमध्ये समावेश असलेल्या गावांचे पत्र जि. प. सीईओ यांना देतील. त्यानुसार सीईओ संबंधित गावांना नोटीस बजावतील. नोटीसनंतर संबंधित गावच्या ग्रामपंचायतींचा ठराव काहीही होऊ दे हद्दवाढ होणारच असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
प्रस्ताव सादर करण्याबाबत प्रशासकांना पत्र
मनपा आयुक्त यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून शहराशी एकरुप झालेल्या उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सरकारला सादर करावा, असे पत्र महापालिका आयुक्तांना दिले असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
खंडपीठाचा प्रश्नही लवकरच मार्गी
मुंबइ उच्च न्यायालयाच खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या लढ्याला लवकरच यश मिळणार आहे. कोल्हापूर सर्किट बेंच स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे खंडपीठाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून महिनाभरात सकारात्मक वृत्त मिळेल असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
जमिनींवरील आरक्षणाबाबत गैरसमज
हद्दवाढीनंतर जमिनींवर आरक्षण पडणार याबाबत मोठा गैरसमज पसरवला जात आहे. शाळा, मैदाने, उद्याने यासाठी सरकारी नियमाप्रमाणे आरक्षण पडते. त्या आरक्षणाशी लोकप्रतिनिधींचा काही संबंध नसतो. आरक्षण आम्ही टाकत नाही.
प्राधिकरणही सक्षम केले जाणार आहे. त्यामुळे प्राधिकरणकडूनही ही आरक्षण टाकली जाणारच आहे. ज्या-त्या भागातील मूलभूत सुविधांचा विचार करुन आरक्षण पडणारच आहेत. त्यामुळे जमिनींवर आरक्षण पडणार या गैरसमजातून बाहेर पडावे, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.