Kolhapur Blind Singer: एक धागा सुखाचा .. शंभर धागे दु:खाचे, अंध गायकांच्या सुरांनी कोल्हापूरकर भारावले
एक धागा सुखाचा... या गीताचे बोल रहिवासीयांच्या काळजाला जाऊन भिडत होते
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : शाहूपुरीतील व्यापारी पेठेचा परिसर. वेळ रात्री दहाची. भुरभुर पडणारा पाऊस. शाहूपुरी बऱ्यापैकी शांत झालेली. आणि अशा वातावरणात एक धागा सुखाचा ....शंभर धागे दु:खाचे या गाण्याचे सूर या शांततेला छेद देत होते. शांत झालेल्या घराच्या गच्चीची, बाल्कनीची दारे किलकिलत होती.
गच्ची, बाल्कनीत येऊन या रस्त्यावरचे रहिवासी हे गाणे कोण म्हणतंय ते बघत होते. त्यांना व्यापार पेठेतील रस्त्यावरून भुरभुरत्या पावसात कोणीतरी तिघेजण एकमेकाला आधार देत हे गाणे म्हणत म्हणत पुढे जाताना दिसत होते. सुरुवातीला नेमके हे काय चालू आहे हे रहिवासीयांना कळत नव्हते. पण एक धागा सुखाचा... या गीताचे बोल रहिवासीयांच्या काळजाला जाऊन भिडत होते.
रस्त्यावरून जाणारे - येणारे थांबत होते. वाहनाचे वेगही मंदावत होते. शाहूपुरी व्यापार पेठ गल्लीत बुधवारी रात्रीचे हे चित्र. त्यातले हे तिघेजण म्हणजे धनंजय, धीरज आणि अश्विनी तिघेही अंध. पण, रस्त्याची एक कडा धरुन जणू ते या भुरभुरत्या पावसात आपल्या सुरांची शिंपण करत करतच पुढे जात होते.
सुरांची किनार मिळालेले त्यांचे गाणे ऐकायला गोड वाटत होते. पण या तिघांच्याकडे पाहून रहिवासीयांचे काळीज पोखरत होते. गेले काही दिवस रोज रात्री हे तिघेजण रात्री आठ साडेआठनंतर साडेदहापर्यंत कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जात कराओकेच्या साथीने सुंदर गाणी गात आहेत. त्यांची गाणी देवाची, देशभक्तीची आहेत.
गाजलेल्या चित्रपटातील आहेत. रात्री कोणाच्यातरी आठवणी जिवंत करणारी आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांनी अंध आहे म्हणून कोणाकडे अंधत्वाचे भांडवल करून त्यांनी हात पसरलेला नाही. ते तिघेजण आपल्या सुंदर आवाजात गाणी म्हणतात. त्यासाठी त्यांनी कराओके सेट घेतला आहे.
या सेटला चाके असलेला एक ट्रे जोडला आहे. तो धनंजय पुढे ओढत असतो. धीरज व आश्विनीच्या हाती माईक असतो आणि एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत या तिघांचा ताफा पुढे जात असतो. हे तिघे रात्रीच गाणी म्हणत का जातात यालाही कारण आहे. रात्री रस्त्यावरची वाहतूक कमी झालेली असते.
सर्वत्र शांतता असते. त्यामुळे रस्त्याची एक कडा धरून या तिघांना पुढे पुढे जाता येते. आणि शांत वातावरणामुळे गाण्याचे बोलही लोकांच्या कानावर व्यवस्थित पडत राहतात. लोक आपल्या घराच्या दारात येऊन गॅलरी, बाल्कनीत उभारुन गाणी ऐकू शकतात. आणि कराओके सेटसह एखाद्या रिक्षात बसून तिघेही रात्री आपल्या घरी जातात.
या तिघांना या निमित्ताने सह्रदयतेचे खूप अनुभव येतात. समाजात काही चांगलं उरलेलंच नाही, असे आपण सहज म्हणत असलो तरी वास्तव तसे नाही हे या तिघांचे पक्के मत आहे. अनेक जण त्यांना मदतीचा हात देतात. काहीजण या तिघांना आपली फर्माइश सांगून आपल्याला हवे ते गाणेही म्हणून घेतात. हे तिघे अंध आहेत. पण कधीही देवाने आमच्याच वाट्याला हे अंधत्व का दिले, असे ते म्हणत नाहीत.
रडगाणे तर अजिबात गात नाहीत किंवा या अंधत्वाचे भांडवल करत नाहीत. या तिघांचा आवाज खूप चांगला आहे. या आवाजाचा आधार ते घेतात. आणि वेगवेगळ्या धाटणीची गाणी म्हणतात. लोक त्यांचे कौतुक करतात. गाण्याबद्दल शाबासकी देतात. बुधवारी रात्री शाहूपुरी पहिल्या गल्लीत हे तिघे गात होते. भुरभुर पाऊस चालू होता. आणि जणू या पावसाने त्यांचा सुंदर सूर नवी पालवी फुटावी तसा फुलत होता.