कोल्हापूर कला महोत्सव फेब्रुवारीमध्ये रंगणार; आमदार सतेज पाटील यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर आर्ट फौंडेशन संस्थेचा चौथा कोल्हापूर कला महोत्सव 24 ते 27 फेब्रुवारी 2024 रोजी दसरा चौकातील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये चित्र, शिल्प क्षेत्रातील कलावंत आपल्या दर्जेदार कलाकृतीसह सहभागी होणार असल्याची माहीती कोल्हापूर आर्ट फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आधुनिक काळात आपल्या कोल्हापूरची कला एका नव्या वळणावर उभी आहे. कलाक्षेत्रात नवे प्रयोग, संदर्भ, विचार एकमेकांना पुरक ठरावेत आणि यातून कोल्हापूरचे कलाक्षेत्र अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, स्थानिक कलावंतांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळावी असा प्रामाणिक प्रयत्न कोल्हापूर कला महोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्याने आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. यापूर्वी 2011 ला पहिला, 2014 रोजी दुसरा आणि 2018 ला तिसरा कला महोत्सव संपन्न झाला. प्रत्येक वेळी विविध क्षेत्रातील जाणकारांसोबत तीन ते चार लाख कला रसिकांनी भेट देत असतात. कलाक्षेत्रातील हे एक दर्जेदार व्यासपीठ असल्यामुळे जाणकार कला रसिक लाखो रुपयांच्या कलाकृती येथे खरेदी करत असतात.
यापूर्वी प्रमाणेच कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या या चौथ्या कला महोत्सवासाठी दसरा चौकातील मैदानावर कला दालन सदृश्य मंडप उभा केला जाणारा आहे. त्यामध्ये चित्रकार, शिल्पकार, हस्त कारागीर यांना आपल्या कलाकृतीच्या प्रदर्शित करण्यासाठी स्टॉल असणार आहेत. सोबत कोल्हापुरातील अस्सल खाद्य पदार्थांचे स्टॉल, विविध वाद्य आणि संगीताचे दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. कोल्हापूर आर्ट फौंडेशन द्वारा कला महोत्सवाची तयारी सुरू असून, त्या मध्ये सहभागी होण्यासाठी माहिती मार्गदर्शनासाठी समन्वयक प्रशांत जाधव, प्राचार्य अजेय दळवी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.