Navratri 2025 Ambabai Temple: अंबाबाई इरल्या आड, गाभाऱ्याची स्वच्छता, देवीचे दर्शन सुरु
यामुळे भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यासह अंतर्गत भागाच्या स्वच्छतेसाठी बुधवारी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी दिसभर बंद होते. यामुळे भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या उत्सवमूर्तीचे दर्शन भाविकांनी घेतले.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून मंदिराच्या सभोवती विविध स्वच्छतेची कामे सुरू आहेत. आज गुरुवारपासून देवीच्या सोन्याच्या दागिन्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव अवघा पाच दिवसांवर आल्याने मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. बुधवारी मंदिरातील गाभाऱ्याची साफसफाई करण्यात आली.
यानिमित्ताने वर्षातून एकदा या दिवशी अंबाबाईच्या मूळ मूर्तीला इरलं पांघरून दर्शन बंद ठेवले जाते. देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवली होती. या वेळी परंपरेनुसार एकादशी दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती इरल्यांआड झाकण्यात येते. देवीच्या पुजाऱ्यांनी गाभाऱ्याची स्वच्छता केली. त्याचबरोबर कासव चौक, पितळी उंबरा,
गणपती चौकासह मंदिराच्या अंतर्गत भागाची स्वच्छता केली. मंदिरातील छत, छतावरील झुंबर, दगडी खांब, मंदिरातील भिंती, नक्षीकाम, विविध मूर्तींची स्वच्छता मोहीम दिवसभर सुरू होती. सायंकाळी साडेसातनंतर देवीची मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. पहाटेची काकड आरती आणि आठच्या अभिषेकानंतर मूर्तीला इरलं पांघरून झाकण्यात आले, तर उत्सवमूर्ती सजवून सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात आली.
पुजारी व देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी मिळून गाभाऱ्याची स्वच्छता केली. साफसफाई पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा देवीचा अभिषेक करून सालंकृत पूजा बांधली. आज सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नित्यपूजेत वापरले जाणारे सोन्याच्या जडावी अलंकारांची आज स्वच्छता करण्यात येणार आहे. ही स्वच्छता कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मंदिराच्या आवारातील मंडपात करण्यात येणार आहे.
साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नऊ दिवस देवीची विविध रुपांत जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. तसेच देवीसाठी नित्यालंकारासह नवरात्र काळात उत्सवासाठी महत्त्वाचे पारंपरिक दागिने परिधान केले जातात. यापार्श्वभूमीवर दागिन्यांची स्वच्छता केली जाते, यात देवीचे सोन्याचे किरीट, चंद्रहार, कवड्यांची माळ, सोनेरी पालखी तसेच इतर हिरेजडित अलंकारांची स्वच्छता केली जाते.
स्वच्छता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमार्फत कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पाडली जाते, ज्यामध्ये मंदिरातील अनेक सेवेकरी सहभागी असतात. नवरात्रोत्सवाच्या काळात हे चमकदार दागिने देवीला परिधान केले जातात, त्यामुळे उत्सवाचे सौंदर्य आणखी वाढते.
या दागिण्यांची होणार स्वच्छता
देवीच्या नित्य व नैमित्तिक वापरातील सर्व सोन्याचे, चांदीचे व हिरे-जडवा-माणकांचे दागिने, जसे की किरीट, चंद्रहार, कवड्यांची माळ, वाळे, कुंडले अंबाबाईचा जडावाचा किरीट, कुंडले, पान, चिंचपेटी, सातपदरी कंठी, मोहनमाळ, मंगळसूत्र, कोल्हापुरी साज या सोन्याच्या दागिन्यांसह श्रीयंत्र, सोन्याची पालखी, चौर्या, मोर्चल, चोपदार दंड, कवड्यांची माळ इत्यादीं दागिन्यांचा समावेश असतो.
दरम्यान, दर्शन रांगेवरील मंडपावरील काम पूर्ण झाले आहे. त्याठिकाणी भाविकांना पंख्याची सोय करण्यात येत होती. त्याचबरोबर मंदिरातील फरशा वरखाली असल्याने तीथे लाकडी फ्लोरिंग करण्यात येत आहे.