Good News : कोल्हापूर-नागपूर विमानसेवेची सुरूवात 15 मे पासून, व्यापार, पर्यटनाला चालना
लवकरच कोल्हापुरातून गोवा, सुरत आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुद्धा सुरु होतील - खासदार महाडिक
कोल्हापूर : कोल्हापूर विमामसेवेच्या संदर्भात आणखी एक चांगली बातमी समोर येत आहे. १५ मे पासून कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेला सुरूवात होत आहे. त्यामुळे कोल्हापूर आता थेट राज्याच्या उपराजधानीशी हवाईमार्गाने जोडले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या दळणवळणासाठी एक आनंदाची बातमी असल्याचे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले आहे.
आता कोल्हापूर थेट राज्याच्या उपराजधानीशी जोडले जात असल्याने कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. आठवड्यातील पाच दिवस कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू होणार आहे. स्टार एअरवेजच्या विमानात १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास आसन व्यवस्था असेल. त्यामुळे कोल्हापूरचं विमानतळ आता नवनवीन भरारी घेईल, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार महाडिक म्हणाले, सातत्याने कोल्हापूर विमानतळाच्या विकास आणि विस्तारासाठी प्रयत्न केले आहेत. केंद्र सरकार स्तरावर पाठपुरावा केला आहे. त्यामुळे धावपट्टी विस्तारीकरण, नाईट लँडिंग, आधुनिक अग्निशमन वाहन, नवी टर्मिनल बिल्डिंग अशी कामे मार्गी लागली. इथून पुढेही विमानतळावरील भौतिक सुविधांसह विविध मार्गांवर हवाई सेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्नशील राहू.
१५ मे पासून मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातील पाच दिवस स्टार एअरवेजकडून कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू होत आहे. नागपूरहून सकाळी दहा वाजता विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरात येईल. त्याचदिवशी सकाळी बारा वाजता कोल्हापूरातून विमान उड्डाण करेल आणि दुपारी दीड वाजता विमान नागपूरमध्ये पोचेल. याशिवाय लवकरच कोल्हापुरातून गोवा, सुरत आणि अहमदाबाद या विमानसेवा सुद्धा सुरु होणार आहेत, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली.