कोल्हापूरात स्वाभिमानी आक्रमक! ट्रॅक्टर पेटवले, ऊस तोडण्या थांबवल्या!
मागील वर्षीचे शिल्लक 400 रूपये आणि यावर्षीच्या हंगामातील उसाला 3500 रूपये दर मिळावा यासाठी आंदोलन आणि उपोषण करूनसुद्धा सरकार आणि साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या मागण्या गांभिर्याने घेत नाहीत त्यामुळे कोल्हापूरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज वारणा परिसराती ऊस तोडण्या स्वाभिमानी संघटनेने बंद पाडून गुरूदत्त साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणार ट्रॅक्टर पेटवला आहे.
ऊस दराबाबत शेतकरी संघटना कालपासून अचानक आक्रमक झाल्या आहेत. 1 नोव्हेंबर पासून शासनाने राज्यातील ऊस हंगाम सुरु राहील असे जरी जाहीर केले असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत हंगामातील 400 रूपये अधिक चालू वर्षीच्या ऊस हंगामाला 3500 रूपये दर जाहीर करावा अशी मागणी केली आहे. जर असे नाही झाले तर ऊसाची धुरांडे पेटू देणार नाही असा इशारा साखर कारखानदार आणि राज्य शासनाला दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी हे उपोषणाला बसले आहेत. बरेच दिवस झाले तरी साखर कारखानदार आणि राज्य शासन लक्ष देत नसल्याने आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. आज जिल्ह्यातील वारणा साखर परिसरातील ऊस तोडण्या स्वाभिमाऩी शेतकरी संघटनेने बंद पाडल्या. तसेच वारणेसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या उलथवण्यात येऊन त्यांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. दुसरीकडे गुरुदत्त साखर कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर पेटवण्यात आले आहेत. ही ऊस वाहतूक करणारी वाहने कोणी पेटवली याची ओळख अद्याप पटलेली नाही.