For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर बनतयं म्हैस दुधाचा ब्रँड! दुग्धपंढरीत धवल क्रांतीला बळ

04:55 PM Jun 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोल्हापूर बनतयं म्हैस दुधाचा ब्रँड  दुग्धपंढरीत धवल क्रांतीला बळ
Advertisement

गोकुळ, वारणा दूध संघाचे दूध उत्पादन वाढीला प्रोत्साहन

धीरज बरगे कोल्हापूर

दुभत्या जनावरांसाठी पोषक असणारे वातावरण, हिरव्या चाऱ्याची उपलब्धता, दर्जेदार पशुखाद्य, जनावरांची घरातील सदस्यांप्रमाणे घेतली जाणारी काळजी, दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळ, वारणा यासारख्या दूध संघांकडून विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारे प्रोत्साहन याकारणांमुळे जिल्ह्यात दर्जेदार दूध उत्पादन होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधासारखी चव अन्य जिल्ह्यातील दूधाला नाही. परिणामी मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा यासह कोकणातून कोल्हापूरच्या म्हैस दूधाला मोठ्याप्रमाणात मागणी आहे. ग्राहकांमधून गोकुळ, वारणा दूध संघाच्या म्हैस दूधाला प्रथम पसंती दिली जात आहे. त्यामुळे गोकुळ, वारणा यासह जिल्ह्यातील अन्य सहकारी, खासगी दूध संघांच्या माध्यमातून कोल्हापूर म्हैस दूधाचा ब्रँड बनला आहे.

Advertisement

कृषीप्रधान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात शेतीसोबतच धवल क्रांतीलाही बळ मिळत आहे. ग्रामीण भागात दूध संकलनासह दूध संस्था, दुभत्या जनावरांच्या संख्येत वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात दुग्ध व्यवसायालाही भरभराटी मिळाली आहे. खतांचे वाढते दर, मशागतीचा वाढता खर्च यामुळे शेती खर्चिक ठरत आहे. अशा काळात बळीराजाला दुग्धव्यवसायातून आर्थिक आधार मिळत आहे. जिल्ह्यातील गोकुळ, वारणा हे प्रमुख दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टा सक्षम करण्यामध्ये मोलाची भुमिका बजावत आहेत.

कोल्हापूरचे दूध दर्जेदार....
जागतिक मानांकानुसार दुधामध्ये प्रतिमिलि एक लाखापेक्षा जास्त जिवाणू नसावेत असे मानले जाते. भारतामध्ये हे प्रमाण पाच लाख प्रतिमिलि इतके आहे. भेसळीचे प्रमाणही आहे. त्यामानाने कोल्हापुरातील दूधाचा दर्जा उत्तम आहे. भेसळीचे प्रमाण शुन्य असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

Advertisement

गोकुळचे दूध संकलन अडीच लाख लिटरने वाढले
गोकुळ दूध संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत गोकुळच्या दूध संकलनात सुमारे 2.64 लाख लिटरची वाढ झाल्याचे दिसून येते. सध्या गोकुळकडुन 15.21 लाख लिटर दूध प्रतिदिन संकलन केले जात आहे.

वर्षभरात 2374 जातीवंत म्हैशींची खरेदी
दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळकडून जातीवंत म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांना 40 हजार रुपये अनुदान देत प्रोत्साहन दिले जात आहे. या वर्षभरात गोकुळच्या प्रोत्साहनातून जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हरियाणा, गुजरात येथून 2374 जातीवंत म्हैस खरेदी केल्या आहेत. तर मागील वर्षात सुमारे पाच हजार जातीवंत म्हैस खरेदीसाठी गोकुळने अनुदान दिले आहे.

गाय दूधाला सहा रुपये ज्यादा दर
राज्यातील दूध संघांकडून गाय दूधाला 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफसाठी प्रतिलिटर 27 रुपये दर दिला जात आहे. राज्यभरातील दूध संघांच्या तुलनेत गोकुळकडुन जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर 33 रुपये दर दिला जात आहे जो अन्य दूध संघांच्या तुलनेत सहा रुपये ज्यादा आहे. त्यामुळे गोकुळच्या गाय दूध संकलनात गेल्यावर्षभरात दीड लाख लिटरहून अधिक वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील गाय व म्हैशींची संख्या अशी :
गाय : 2 लाख 77 हजार 823
म्हैस : 5 लाख 53 हजार 653
एकूण : 8 लाख 31 हजार 476
गोकुळच्या माध्यमातून जातीवंत म्हैस खरेदीची गेल्या तीन वर्षातील आकडेवारी अशी :
वर्ष जातीवंत म्हैस खरेदी संख्या
2021-22 1658
2022-23 1575
2023-24 2374
एकुण 5607
गोकुळचे मे महिन्यातील गतवर्षी आणि सध्याचे दूध संकलन असे :
वर्ष गाय दूध म्हैस दूध (लिटरमध्ये)
2023 7 लाख 8 लाख 72 हजार
2024 5 लाख 72 हजार 6 लाख 49 हजार

जिल्ह्यातील अन्य दूध संघांचं दूध संकलन लिटरमध्ये असे :
वारणा (साडे चार ते सहा लाख लिटर), स्वाभिमानी (70 हजार ते एक लाख लिटर), दत्त फुड (40 हजार), अमुल (30 हजार), भारत डेअरी (68 हजार), गोविंद (पाच हजार), सह्याद्री (18 हजार), आदित्य (700), चितळे (1600), वाळवा (तीन हजार), जोतिर्लिंग (20 हजार), समाधान (10 हजार), शाहू (55 हजार), समृध्दी (सात हजार), यळगुड ( सहा हजार), विमल (24 हजार), वैजनाथ (12 हजार), प्रतिभा (1 लाख 10 हजार), अन्नपुर्णा (25 हजार)

Advertisement
Tags :

.