सरुडमध्ये उत्स्फूर्तपणे ८५ टक्के मतदान : भर उन्हातही मतदानासाठी मतदाराच्या रांगा.
शाहूवाडी तालुक्यात सर्वात जास्त मतदार संख्या असणाऱ्या सरुड गावात उत्स्फुर्तपणे ८५ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला . महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजीत पाटील , बाबासाहेब पाटील - सरुडकर गोकुळच्या माजी संचालिका अनुराधा पाटील यानी सकाळी साडेसात वाजता मतदान केले.
दरम्यान सरुडसह सरुड जि . प . मतदार संघात येणाऱ्या सर्वच गावात गतलोकसभेच्या निवडणूकीपेक्षा या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले आहे.
माजी आमदार सत्यजीत पाटील हे प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवत असल्याने येथील सरूडसह परिसरातील गावामधील मतदारांच्यात मतदानासाठी मोठा उत्साह होता . भरदुपारच्या कडक उन्हातही सरुड गावातील मतदार उत्स्फुर्तपणे मतदानासाठी घरातुन बाहेर पडत मतदान केंद्रांवर येत होते . त्यामुळे गावातील सर्व पाचही मतदान केंद्रांवर दिवसभर मतदारांची मोठी गर्दी होऊन मतदानासाठी मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या . दुपारी १ वाजेपर्यंत गावातील ५० टक्के मतदारांनी मतदान केले होते . तर दुपारी ४ वा . पर्यंत ७० टक्के मतदान झाले होते . या निवडणूकीत गावातील एकुण ५३११ मतदारांपैकी ४५११ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.