For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सहानुभूती की हिंदुत्व...शहरवासीय कोणत्या लाटेवर स्वार ? कोल्हापर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात उमेदवार ठरणार कळीचा मुद्दा

12:39 PM Feb 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
सहानुभूती की हिंदुत्व   शहरवासीय कोणत्या लाटेवर स्वार   कोल्हापर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात उमेदवार ठरणार कळीचा मुद्दा
Kolhaour North Constituency

देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत आघाड्या आणि उमेदवार कोण असणार, याची उत्कंठा सर्वसामान्यांमध्ये आहेच. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल. लोकसभा निवडणुकीचे प्रतिध्वनी विधानसभेवर नक्कीच उमटणार आहेत. कोल्हापूर जिह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील संभाव्य चित्र काय असू शकते ? आताची राजकीय परिस्थिती काय आहे ? उद्याच्या राजकारणाची हवा कोणत्या दिशेला जाणार आहे, याचा आढावा ‘तरुण भारत संवाद’च्या व्यासपीठावर आजपासून देत आहोत...!

Advertisement

संतोष पाटील कोल्हापूर

कोल्हापूर शहर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या प्रमुख चार पक्षांची शहरातील राजकीय ताकद ठरलेली आहे. भाजप आघाडीची हिंदुत्वाच्या मुद्यावर ध्व्रीकरण करण्याची रणनिती आहे. काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडी जनसंपर्क, पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची सहानुभूती, सत्ताकाळात केलेली विकासकामे या त्रिसुत्रीवर आधारीत निवडणुकीला सामोरे जातील. आजच्या घडीला अर्धा डझन तुल्यबळ इच्छुकांच्या मांदियाळीत सहानुभूती की हिंदुत्व यापैकी कोणत्या लाटेवर स्वार होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर 69 हजार 736 मते, तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांना 47 हजार 315 तर भाजपचे महेश जाधव यांना 40 हजार 104 मते मिळाली होती. राष्ट्रवादीला 9 हजार 887 मते पडली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांना 91 हजार 53 तर राजेश क्षीरसागर यांना 75 हजार 854 मते मिळाली होती. या निवडणुकीत ‘नोटा’ 3 हजार 39 मते घेऊन तिसऱ्या स्थानी होते.

Advertisement

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. काँग्रेसचे चंद्रकांत जाधव निवडून येण्याआधी उत्तरची ही जागा शिवसेनेकडे होती. अर्थात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आमदार होते. त्यामुळे शिवसेनेने या जागेवर दावा केला. तसाच काँग्रेसनेही केला होता. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे महाविकास आघाडींतर्गतच मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्न सुरू होते. परिणामी, महाविकास आघाडीचे त्रांगड निर्माण झाले होते. भाजपच्या नगरसेविका जयश्री जाधव राष्ट्रीय काँग्रेसकडून रिंगणात उतरणार की महाविकास आघाडीकडून लढणार, हे स्पष्ट नव्हते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रीमती जाधव यांनी भाजपकडून निवडणूक लढवल्यास कदम माघार घेतील, निवडणूक बिनविरोध करु. असे आवाहन केले होते.

Advertisement

अखेर आघाडी धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तरची जागा काँग्रेसला सोडली. पोटनिवडणूक जयश्री जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम यांच्यात झाली. एकूण 61.19 टक्के मतदान झाले. श्रीमती जाधव तब्बल 18 हजार 901 मताधिक्याने विजयी झाल्या. जाधव यांना एकूण 96 हजार 226 मते मिळाली तर भाजपचे कदम यांना 77 हजार 426 मते मिळाली. राज्यात याचवेळी पंढरपूर आणि पुणे-पिंपरी-चिंचवाड येथील जागा आघाडीतील समन्वयाअभावी ‘महाविकास’ने गमावल्या. मात्र, कोल्हापुरात सतेज पाटील यांनी आघाडीची मोट बांधत ‘भाजप’चा करेक्ट कार्यक्रम केला होता. महापालिकेच्या राजकारणामुळे पेठापेठांतील कार्यकर्त्यांचे जाळे आणि कसबा बावडा परिसरातील 20 हजारांहून अधिक हुकमी मते ही सतेज पाटील यांची उत्तरमधील ताकद आहे. ही जमेची बाजू काँग्रेसला विजयासमीप नेण्यास कारणीभूत ठरते.

पोट निवडणुकीत डावलल्याने आणि महाविकासच्या राजकारणात भविष्याची दिशा कळल्याने राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर त्यांचे राजकीय गुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंद केले. मागील दीड-दोन वर्षातील राज्यातील सत्ता काळात क्षीरसागर यांनी शहरासाठी भरघोस निधी आणत विधानसभा निवडणुकीची मांड पक्की केली आहे. विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी केली असली तरी काँग्रेसकडून माजी आमदार मालोजीराजे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे. मालोजीराजे आणि जाधव यांच्यापैकी एक निवड करताना काँग्रेसची पर्यायाने सतेज पाटील यांची कसरत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे उपनेते संजय पवार यांच्याही नावाची चाचपणी होऊ शकते.

तशीच भाजप आघाडीतही उमेदवारीचे त्रांगडे आहे. राजेश क्षीरसागर की सत्यजित कदम यांच्यापैकी निवड करताना आघाडीच्या राज्य पातळीवरील नेत्यांचा कस लागेल. दोन्ही बाजूला उमेदवारी कोणालाही मिळाली तरी उत्तरची निवडणूक जिह्यात लक्षवेधी असेल. कारण शिवसेना ठाकरे गटाला बंडखोरीचा वचपा काढायचा आहे. काँग्रेसला आपलाच मतदारसंघ असल्याचे दाखवून द्यायचे आहे. तर शिंदे गट पर्यायाने राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी डावलल्याचा आणि मागील पराभवाचा बदला घ्यायचा आहे. मालोजीराजे यांना पॉलिटीकल कमबॅकचे वेध लागले आहेत. सत्यजित कदम हे वेटींग पिरियड संपवायचा आहे. अशा दोलायमान स्थितीत कोल्हापूरची लढत आणि मतदारांचा कौल राज्यातील निवडणुकीची दिशा स्पष्ट करणारा असेल.

मतदानाचा टक्का वाढतोय
मागील 2019 च्या निवडणुकीत एकूण 2 लाख 83 हजार 480 मतदारांपैकी 1 लाख 72 हजार 168 मतदारांनी मतदान केले होते. यंदाच्या निवडणुकीत 2 लाख 91 हजार 539 मतदारांची संख्या होती. या निवडणुकीत 8 हजार 59 नवमतदारांची संख्या वाढली. पोटनिवडणुकीत 1 लाख 74 हजार 923 मतदान झाले. यावेळी मागील निवडणुकीच्या तुलनेत सुमारे अडीच हजार वाढीव मतदान झाले. कोल्हापूरकरांच्या मतांची टक्केवारी समान असली तरी आश्चर्यकारक निकालाची परंपरा आहे. वाढीव टक्का म्हणजे प्रस्थापितांना विरोध हा इतर मतदारसंघातील निकष कोल्हापूर शहरात लागू होत नाही. कोणाला जिंकवण्यासाठी नाही तर पाडण्यासाठीच कोल्हापूरकर मतदान करत असल्याचे वास्तव आहे.

नेत्यांचा राजकीय कस लागणार
कोल्हापुरात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जातीय सलोखा हा विषय ऐरणीवर आला आहे. स्टेटससारख्या किरकोळ बाबींवर दोन समाजात निर्माण होणारी तेढ येथील सामाजिक वीण ढिली करत आहे. भाजप आघाडीच्या प्रखर हिंदुत्वाच्या मुद्याला सामोरे जाताना राष्ट्रीय काँग्रेसला रणनिती नव्याने आखावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लगेच महापालिका निवडणुकांचे पडघम वाजणार असल्याचे या निकालाचे प्रतिध्वनी तिथे उमटणार असल्याने राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. आमदार सतेज पाटील यांच्या होमपिचवर होणारी येथील लढत आणि निकाल त्यांचे पक्षांतर्गत महत्व वाढवणारी आहे. काँग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी सतेज पाटील हेच उमेदवार असल्याचे समजून दोन्ही बाजूंनी प्रचाराच्या तोफा धडाडतील. त्यामुळे उत्तरची निवडणूक उमेदवारांसह नेत्यांचा राजकीय कस लावणारी ठरेल.

Advertisement
Tags :
×

.