Kolambi Project : कोळंबी प्रकल्पात अज्ञाताकडून विषप्रयोग, आचाऱ्यातील खळबळजनक घटना
घटना 13 मे रोजी रात्री 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घडली
आचरा : आचरा पारवाडी डोंगरेवाडीलगत सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषप्रयोग केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात सुमारे 18 लाख रु. किमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे. याबाबतची फिर्याद प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व अंतोन फर्नांडिस (रा. धुरीवाडा मालवण) यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी अज्ञाताविरोधात भा. न्या. सं. 2023 चे कलम 286, 324 (5) प्रमाणे विषारी पदार्थ टाकून मानवी जीवितास धोका उत्पन्न होईल, अशी कृती करून प्रकल्पातील कोळंबीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 13 मे रोजी रात्री 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तक्रारीनंतर जिल्हा मुख्यालयातून फॉरेन्सिक लॅबची टीम आचऱ्यात दाखल झाली होती. या टीमने पाहणी केली.
गतप्राण झालेल्या कोळंबीचे व सापडलेल्या विषारी पदार्थाचे घटनास्थळी सापडलेले नमुने ताब्यात घेतले आहेत. 13 मे रोजी रात्री 11 ते 12 वाजण्याच्या मुदतीत कोणीतरी अज्ञात इसमाने आचरा पारवाडी येथील कोळंबी प्रकल्पातील दोन तलावात कोणते तरी विषारी पदार्थ टाकून मानवी जीवितास धोका उत्पन्न होईल, अशी कृती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच दोन तलावातील कोळंबी गतप्राण होऊन कोळंबी प्रकल्पातील सुमारे चार हजार किलो वजनाच्या अंदाजे अठरा लाख रुपये किमतीच्या कोळंबीचे नुकसान अज्ञाताने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुरुवारी दुपारी ओरोस येथून फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती. टीमचे कमलेश सोनावणे, तनुजा रावले, आचरा पोलीस मीनाक्षी देसाई, बाळू कांबळे, सुशांत पुरळकर, स्वाती आचरेकर तपासात सहभागी झाले होते.