कोळंब मंडळात भातपिकाच्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी; पंचनामे करण्याच्या सूचना; शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी
मालवण प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कोळंब मंडळातील विविध गावांमध्ये अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीची तहसीलदार गणेश लव्हे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली.
भातशेतीमध्ये पाणी साचल्याने पिकांची पडझड झाली असून, काढणीच्या अवस्थेतील भाताचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित महसूल अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
तहसीलदार लव्हे यांनी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करताना नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच शासनाच्या निकषांनुसार पंचनामे करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
भातपीक हे कोकणातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. ऐन काढणीच्या काळात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.