कोगे ग्रामपंचायतकडून थकीत घरफाळा व पाणीपट्टीधारकावर कारवाई
ग्रामसेवकांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक; तर थकबाकीदारांना धडकी; ग्रामीण भागात धडक मोहिम राबविणारी पहिली कोगे ग्रामपंचायत
कसबा बीड/ वार्ताहर
कोगे तालुका करवीर येथे ग्रामपंचायतकडून थकीत घरफाळा व पाणीपट्टीधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्याची मोहिम राबविण्यात आली आहे. कोगे गावचे ग्रामसेवक दिनकर आंबेकर यांनी गेली अनेक दिवस सरपंच व सदस्य यांची मिटिंग घेऊन थकीत घरफाळा व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरविले. मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जर घरफाळा व पाणी पट्टी भरली नाही तर ग्रामपंचायत देणाऱ्या सुविधा बंद कराव्यात नाहीतर वेळेत घरफाळा व पाणीपट्टी भरणाऱ्या लोकांनासुद्धां वाईट सवय लागेल. या हेतूने ही धडक मोहिम राबवली. यामुळे ग्रामपंचायत कारभार चोख करणेस अडचणी निर्माण होणार नाहीत. तसेच नागरिक वेळेत घरफाळा भरतील.
यासाठी थकीत नागरिकांना स्पीकरवरून सुचना देण्यात आल्या. नंतर त्यांचें नावे नोटीस बजावण्यात आली. तरीपण थकीत नागरीकनी याकडे दुर्लक्ष केले . नाईलाजास्तव कठोर भूमिका घेणे आवश्यक होते. गेली दोन दिवस झाले ग्रामसेवक श्री. आंबेकर यांनी आपली वसुली पथक टीम व जेसीबी मशीन घेऊन जे थकीत आहेत त्याचे नळ कनेक्शन जेसीबीच्या साह्याने उकरून बंद केले. तसेच वसूली दिल्याशिवाय नळ कनेक्शन चालू करू नये यासाठी खडी व सिमेंट साह्याने कायमचे बंद केले. ही धडक मोहिम राबविल्याने काहींनी ताबडतोब पैसे भरून सहकार्य केले तर काहींचे कनेक्शन बंद करण्यात आले.
ग्रामसेवकांच्या या कार्याने जे नागरिक वेळेत घरफाळा भरतात, त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत. या मोहिमेसाठी सरपंच बनाबाई यादव, उपसरपंच नामदेव सुतार, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी नवनाथ पाटील, गोविंद पुदाले, बाजीराव पाटील, अर्जुन पाटील, अकबर बागवान, रणजीत सातपुते व टीम यांचे सहकार्य लाभले.