पुलावरून ऊसाची वाहतूक होऊ शकते पण बससेवा नाही; कोगे - बहिरेश्वर पुलावरील प्रकार
विश्वनाथ मोरे, कसबा बीड
ग्रामीण भागाला शहराशी जोडले जावे यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने केएमटी बस सुरू करण्यात आली.यामधून ग्रामीण भागातील लोक शहराशी जोडले जातील व महानगरपालिकेला केएमटी बसच्या माध्यमातून उत्पन्न निर्माण होते.गेले अनेक वर्षे ग्रामीण भागातील केएमटी गंगावेश विभागामधून कोगे गावच्या केएमटी बसने अधिक नफा मिळवून दिला आहे.पण कोगे -बहिरेश्वर या पुलावरून गेले तीन वर्षे या पुलाचे नुकसान झाल्यामुळे केएमटी वाहतूक बंद करण्यात आली आहे.यासाठी या पुलाला फंड उपलब्ध करण्यात आला. काही अंशी या फंडातून काम सुद्धा करण्यात आले पण या पुलावरून 10 ते 15 टन ऊस वाहतूक होत आहे, असे चित्र दिसत असून सुद्धा केएमटी बस सुरू न होणे हे दुर्दैव आहे.
कोगे ते बहिरेश्वर कमानीपर्यंत गेली अनेक वर्षे रस्ता रुंदीकरण व रस्ता काम झालेले नाही. या रस्त्यावरून बहिरेश्वर, म्हारूळ , आमशी आदी बारा वाड्याना जाणारा रस्ता दुर्लक्षित आहे. तसेच कोगे ते बहिरेश्वर दरम्यान गावाला लागून असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा शेण व इतर अतिक्रमण झाले आहे, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अडचणी निर्माण होत आहेत याची जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दखल घेणे आवश्यक आहे. जर या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाले तर आमशी व बारा वाड्यांना जाणारा जवळचा रस्ता होईल. यामुळे केएमटी बस चालू होण्यास ही बाब सुद्धा महत्त्वाची आहे.