Child Heart Attack Kolhapur: कोडोलीत आईच्या मांडीवरच बालकाने सोडला प्राण
दहा वर्षीय बालकाचा हृदयविकाराने मृत्यू, परिसरात हळहळ
वारणानगर: कोल्हापूरच्या कोडोली गावात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दहा वर्षांच्या मुलाने आपल्या आईच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला आहे. अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.
गणेश मंडळाच्या मंडपात मित्रासोबत खेळत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने धावत जाऊन आईच्या कुशीत विसावलेल्या बालकाने बालकाने मांडीवरच प्राण सोडले. कु. श्रावण अजित गायडे असे त्याचे नाव आहे. यावेळी आईने फोडलेला हंबरडा , कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
आनंदनगर मधील शिवनेरी गल्लीत बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी श्रावण यास वडिलांनी तातडीने उपचारास रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. श्रावण चौथीमध्ये शिकत होता श्रावण हा एकुलता मुलगा होता. चार वर्षांपूर्वी त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला होता.
लहान मुलांतही हृदयविकार
दहा वर्षाच्या मुलाला हृदयविकार असू शकतो का? हाच प्रश्न विचारात आहेत. याचे उत्तर होय आहे. अनुवंशिकता, रक्तवाहिन्यांची आकुंचन प्रसारणाची क्षमता, कावासाकी ताप, अशा स्वरूपाचा लहान मुलांचा आजार आणि हृदयाच्या झडपेचा त्रास यामुळे मुलांना हृदयविकाराचा धक्का बसू शकतो.
काही मुलांच्या रक्तवाहिन्यात दोष असतो. त्यामुळे मूल खेळता खेळता दमते, त्यावेळी अटॅक येण्याची शक्यता असते. कोडोली येथे मृत्यू झालेल्या मुलाचा रिपोर्ट पाहिलेला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे माहीत नाही. पण लहान वयात हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काही लक्षणे आढळली तर त्वरित तज्ञांकडे तपासणी करावी.
- डॉ. अक्षय बाफना, हृदयरोग उपचार विभाग प्रमुख, सीपीआर