१५ हजार लाचेच्या मागणी करणाऱ्या कोडोली मंडल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; पंटरही ताब्यात
वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता.पन्हाळा येथे खरेदी केलेल्या जमिनीचे सात बारा पत्रकी नोंद करण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केलेल्या कोडोली मंडळ कार्यालयाचे मंडल अधिकारी अभिजीत नारायण पवार यांच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पंटर रणजीत उर्फ आप्पा आनंदराव पाटील रा. कोडोली यास अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला यांनी याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात शुक्रवार दि. ३१ मे रोजी फिर्याद नोंदवली आहे.
यातील मुळ तक्रारदार पुरूष वय ३४ यांचे काका यांनी घेतलेली शेतजमीन सात बारा पत्रकी नोंद करून सात बारा देणे करीता पंटर रणजीत उर्फ आप्पा पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे २० हजार रुपयाची मागणी केली होती यामध्ये तक्रारदार पंटर रणजीत व मंडल अधिकारी अभिजीत पवार यांच्यात १५ हजार रुपये तडजोडीची रक्कम ठरली होती सदर रक्कम रणजीत पाटील यांच्याकडे देण्यास मंडल अधिकारी पवार यानी सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भाने तक्रारदार याने दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती त्याची दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी पडताळणी करून गेली पाच महिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे या कारवाईसाठी प्रयत्न सुरू होते. पाच महिन्याने या कारवाईला यश आले असून मंडल अधिकारी अभिजीत नारायण पवार रा. व्हिक्टर पॅलेस जवळ रुक्मिणी नगर,कोल्हापूर यास अद्याप अटक झालेली नाही.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी,पोलीस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला,सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश भंडारे, हावलदार अजय चव्हाण, सुधीर पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बापूसो साळुखे करीत आहेत.