बेसुमार वाळू उपशावर नियंत्रण कोणाचे ?
उंब्रज :
कराड तालुक्यातील तारळी नदीपात्रात इंदोली गावच्या हद्दीत बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. रात्रीच्या वेळी नियमबाह्य पद्धतीने वाळू वाहतूक सुरू आहे. या वाळू उपशाने स्थानिकांच्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून कोणाचेही नियंत्रण नसल्याने उपसा केलेल्या वाळूचे मोजमाप कोण करणार असा सवाल निर्माण झाला आहे. दरम्यान घरकुलासाठी लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळतेय का यावरही देखरेख ठेवणे गरजेचे असून नदीपात्रातून किती वाळू उपसा केला, किती वितरित केली, नियंत्रण कोण ठेवणार, ठेकेदार वाळू इतरत्र चोरून विकणार नाही याची जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदोली (ता.कराड) गावच्या हद्दीत नदीपात्रात सुरू असणारा वाळू उपसा हा वाळू/रेती निर्गती धोरण-२०२५ राज्य मंत्रिमंडळाच्या ८ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमधील निर्णयाचा भाग आहे. शासन आदेशानुसार विहित अटी व शर्थीना अधीन राहून स्थानिक वापर व घरकुलासाठी सहज व सुलभतेने वाळू उपलब्ध करणे तसेच पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यक्तींना हातपाटी-डुबी पध्दतीने विना लिलाव पद्धतींचा वापर करून वाळू गट उपलब्ध करून देणे, खासगी शेतजमिनीमध्ये नैसर्गिक अथवा इतर कारणाने जमा झालेली वाळू निष्काशीत करणे असे लोक हिताचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून शासनाने वाळू निर्गमन धोरण निश्चित केले आहे. याचे सर्वाधिकार जिल्हा स्थरीय वाळू सनियंत्रण समितीच्या हातात असून याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष तर जिल्हा खनिकर्म अधिकारी सदस्य सचिव आहेत.
नदीपात्रातील वाळू गटांचे सर्वेक्षण, स्थळ निरीक्षण करण्यासाठी तांत्रिक उपसमिती असून यामध्ये तहसीलदार अध्यक्ष असून नायब तहसीलदार सदस्य सचिव आहेत. तर यामध्ये गटविकास अधिकारी, उपअभियंता जलसंपदा विभाग, कनिष्ठ भूवैज्ञानिक, वनविभागाचे प्रतिनिधी आदी सदस्य आहेत. तालुक्यातील वाळू उपसा, वितरण बाबत देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम बहुतांश महसूल विभागाच्या हातातच आहे. तालुकास्तरावर असणाऱ्या वाळू सनियंत्रण समितीत तालुक्यातील सर्वच विभागांचे महत्त्वाचे अधिकारी समाविष्ट असल्याने तालुक्यातील सर्वच वाळू निर्गती गटातून होणाऱ्या वाळू उपसा यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य त्यांना पार पाडावे लागणार आहे. यामध्ये पोलीस विभागाला नियमबाह्य पद्धतीने होणारी वाळू वाहतूक रोखावी लागणार असून इतर विभागांना आपली जबाबदारी पाडावी लागणार आहे.
- सरकारमान्य वाळू उपसा; मंडलाधिकाऱ्याची नियुक्तीच नाही
सद्यस्थितीत इंदोली गावच्या तारळी नदीत वाळू उपसा सुरू आहे. हद्दीत ठिकठिकाणी वाळूचे डेपो लावण्यात आले आहेत. सध्याचा वाळूचा दर पहाता काही कोटींच्या किंमतीत येथे वाळू उपसा झालेला आहे. रात्रीच्या वेळी नियमबाह्य वाहतूक केली जाते. डेपोमधली वाळूही कमी होते. त्यामुळे प्रशासनाला हा सावळागोंधळ रोखण्याची गरज आहे. दरम्यान संबधित गावच्या मंडल अधिकाऱ्यांची नुकतीच बदली झाली असून त्याच्या जागी अद्याप नवीन नियुक्ती झाली नाही. त्यामुळे या वाळू उपशावर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.