महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्ञानयोग

06:50 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

सर्वत्र समबुद्धीने पाहणे म्हणजे ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षतेने करणे म्हणजेच कर्मयोग असं बाप्पानी सांगितलं. स्वधर्म म्हणजे आपल्याला ईश्वराने नेमून दिलेलं कार्य होय. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ईश्वराने जीवनात काय कार्य करायचं हे ठरवून दिलेलं असतं पण मनुष्य स्वत:च्या बुद्धीने ते सोडून इतर काहीतरी करत बसतो. त्यामुळे त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत निश्चितच बाधा येते.

Advertisement

जो स्वधर्म पालन म्हणजे वाट्याला आलेले काम व्यवस्थित करतो तो ईश्वराचा लाडका होतो. त्याच्यावर देवाची कृपा होऊन त्याला आत्मनात्मविवेकबुद्धी प्राप्त होते. आत्मनात्मविवेकबुद्धी म्हणजे कोणती गोष्ट आत्म्याशी संबंधित आहे आणि कोणती नाही हे स्पष्ट कळून येणे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे तो इंद्रियांच्या आहारी जाऊन इंद्रियांनी मोहात पडलेल्या वस्तूंच्या प्राप्तीसाठी धडपडत नाही. तो इंद्रियांच्या आहारी न जाता, त्यांना मुठीत ठेवून ज्या गोष्टी त्याच्या आत्म्याचा उद्धार होण्याच्या दृष्टीने उपयोगी असतील त्याच गोष्टी इंद्रियांच्यामार्फत जाणून घेतो. त्यासाठी आवश्यक असलेली आत्मनात्मबुद्धी त्याला निरपेक्ष कर्माने प्राप्त झालेली असते. त्याने आत्म्याशी संबंधित असलेल्या गोष्टी केल्या की त्याचा आत्मा शरीराच्या कचाट्यातून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागतो. ह्या विवेकामुळे जी बुद्धी प्राप्त होते तिलाच ज्ञानयोग म्हणतात.

या ज्ञानयोगामुळे मनुष्य जे कर्म करतो त्यातून निर्माण होणाऱ्या पाप पुण्यास तो जबाबदार नसल्याने त्याचे प्रारब्ध तयार होत नाही. बाप्पा म्हणतात स्वधर्माची जाणीव व आत्मनात्मविवेक समजणे हा योग होय. हा समजला की, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन व्हायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून माणसाने जीवनामध्ये आत्मनात्मबुद्धी प्राप्त करून घेणे हे आपले कर्तव्य समजावे आणि ती प्राप्त होण्यासाठी निरपेक्षतेने वाट्याला आलेले कर्म करत रहावे.

जनकादिक राजांनी असेच निरपेक्ष कर्म करत सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. त्यासाठी त्यांनी लोकसंग्रह केला. लोकसंग्रह म्हणजे लोकांचा जमाव जमवणे नव्हे तर लोकांना त्यांच्यातील सुप्त शक्तीची जाणीव करून देऊन तिला योग्य दिशा प्राप्त करून देणे. त्यांनी ज्याप्रमाणे लोकसंग्रह करून धर्माचे पालन केले त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वधर्म आचरावा. ईश्वराने जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष अवतार घेतला त्यावेळी त्यांनीही अशाच पद्धतीने कर्मे केली.

वास्तविक पाहता त्यांना विशेष काही करण्याची किंवा काही मिळवण्याची बिलकुल गरज नव्हती. तरीही ह्यालोकी जन्म घेतल्यावर येथील लोकांना आदर्श जीवनशैली कशी असावी हे दाखवून देण्यासाठी त्यांनी कर्मयोगाचे पालन केले कारण त्यांना हे माहित होते की, ते ईश्वरी अवतार असल्याने ते ज्याप्रमाणे वर्तन करतील त्याप्रमाणे इतर लोक त्यांचा कित्ता गिरवणार आहेत. त्यांनी जर आदर्शवत वर्तन केले नाही तर त्यांचे पाहून इतर सगळेच चुकीच्या मार्गाला लागतील. हे सर्व सांगून बाप्पा पुढं म्हणाले,

धर्माधर्मौ जहातीह तया युक्त उभावपि ।

अतो योगाय युञ्जीत योगो वैधेषु कौशलम् ।। 49।।

अर्थ- आत्मनात्मविवेक बुद्धीने युक्त असलेला मनुष्य इहलोकी धर्म व अधर्म या दोहोंचाही म्हणजे दोहोंच्या फलांचा त्याग करतो. म्हणून ह्या योगाची जोड करून घे. असे केलेस की, निरपेक्षतेने विधिपूर्वक कर्म करण्यात तुला कौशल्य मिळेल. हे कौशल्य आत्म्याचे परमात्म्याशी मिलन साधून

देते.

आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन घडवून आणण्याच्या दृष्टीने एक बिनतोड युक्ती बाप्पा ह्या श्लोकात सांगत आहेत. त्याचे सविस्तर विवरण आपण पुढील भागात अभ्यासुयात.

क्रमश:

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article