2030 पर्यंत माणूस प्राण्यांशी साधणार संवाद? AI मुळे शक्य होणार ‘प्राण्यांची भाषा’ समजून घेण्याचा चमत्कार; पण धोका मोठा
नवी दिल्ली : कुत्रा भुंकतोय, पक्षी किलबिलाट करत आहेत किंवा व्हेल समुद्रात विशिष्ट आवाज काढत आहेत, यामागे नेमका काय अर्थ आहे, याचे कुतूहल माणसाला हजारो वर्षांपासून आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हे कुतूहल प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संशोधकांच्या मते, 2030 पर्यंत AI च्या मदतीने माणसाला प्राणी आणि पक्ष्यांच्या संवादातील काही संकेत समजून घेणे शक्य होऊ शकते.
यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्यंत लहान इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग उपकरणांचा वापर केला जाणार आहे. या उपकरणांच्या मदतीने व्हेलचे आवाज, लांडग्यांचे आवाज, पक्ष्यांचे किलबिलाट अशा विविध प्राण्यांच्या संवादाची मोठ्या प्रमाणात नोंद केली जात आहे. त्यानंतर AI या आवाजांच्या प्रचंड डेटामधील विशिष्ट पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करेल.
हजारो वर्षांपासून सुरू आहे प्रयत्न
प्राण्यांशी संवाद साधण्याचा माणसाचा प्रयत्न काही नवा नाही. संशोधकांना सुमारे 12,000 वर्षे जुन्या हाडांपासून बनवलेल्या बासऱ्या सापडल्या आहेत. त्यांचा वापर कदाचित पक्ष्यांशी संवाद साधण्यासाठी केला जात असावा, असा अंदाज आहे.
प्राण्यांच्या संवादाचा अभ्यास करणाऱ्या आयरीन पेपरबर्ग यांनी एलेक्स नावाच्या आफ्रिकन ग्रे पोपटावर तब्बल 30 वर्षे संशोधन केले. प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ जेन गुडाल यांनीही चिंपांझींच्या संवादातील संकेत समजत असल्याचे सांगितले होते. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. कारण आता संशोधकांकडे हजारो तासांच्या प्राण्यांच्या आवाजांचे रेकॉर्डिंग आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक AI तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
AI शोधणार प्राण्यांच्या आवाजामागचा अर्थ
लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने विविध प्रजातींचे आवाज रेकॉर्ड केले जात आहेत. या प्रचंड डेटामधून AI अशा नमुन्यांचा शोध घेऊ शकते, जे मानवी निरीक्षणातून आतापर्यंत लक्षात आलेले नाहीत.
जर एखाद्या प्राण्याचा विशिष्ट आवाज विशिष्ट परिस्थितीत वारंवार आढळला, तर त्यामागे एखादा संदेश किंवा भावना असू शकते. अशा पॅटर्नचा अभ्यास करून प्राण्यांच्या संवादाचा अर्थ समजून घेण्याच्या दिशेने मोठी प्रगती होऊ शकते.
या क्षेत्रातील प्रमुख दात्यांपैकी एक असलेले अब्जाधीश जेरेमी कॉलर यांना AI च्या वेगवान प्रगतीमुळे 2030 पर्यंत या दिशेने महत्त्वाचे यश मिळू शकते, असा विश्वास आहे.
प्राण्यांना समजून घेतल्याने निसर्गाचे रक्षण होईल?
संशोधकांच्या मते, माणसाला प्राणी नेमके काय अनुभवतात आणि कशामुळे त्रस्त होतात हे समजले, तर निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. हवामान बदल, औद्योगिक शेती आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होण्यासारख्या प्रश्नांकडे माणूस अधिक संवेदनशीलतेने पाहू शकतो.
पण या तंत्रज्ञानाची दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे.
प्राण्यांची भाषा समजली तर शिकारीही अधिक धोकादायक?
इतिहास पाहिला तर माणसाने प्राण्यांविषयी मिळवलेल्या ज्ञानाचा वापर अनेकदा त्यांच्या विरोधातही केला आहे. विसाव्या शतकात व्हेलची शिकार करणारे लोक सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून व्हेलना पृष्ठभागावर आणत आणि त्यांची शिकार करत असत.
आजही शिकारी पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करून त्यांना सापळ्यात अडकवतात. भविष्यात AI च्या मदतीने प्राण्यांच्या संवादाचा अधिक अचूक अर्थ समजला, तर याचा गैरवापर होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या पक्ष्याला विशिष्ट ठिकाणी आकर्षित करणारा आवाज किंवा इशारा समजला, तर त्याचा वापर शिकारी अधिक प्रभावी सापळे तयार करण्यासाठी करू शकतात.
म्हणूनच प्राण्यांची भाषा समजून घेणे हे तंत्रज्ञानाचे मोठे यश ठरू शकते; पण त्याचा जबाबदारीने वापर करणे हे त्याहून मोठे आव्हान असेल. AI माणसाला प्राण्यांच्या जगाच्या जवळ घेऊन जाऊ शकते, मात्र त्या जगाचे रक्षण करायचे की त्याचा गैरफायदा घ्यायचा, हे शेवटी माणसाच्याच हातात असणार आहे.