प्रवाशाने केला रिक्षाचालकावर चाकूहल्ला
न्यू गांधीनगर येथील तरुणाला अटक, रिक्षाचालकांत घबराट
बेळगाव : सोमवारी मध्यरात्री प्रवाशाने ऑटोरिक्षा चालकावर चाकूहल्ला केला आहे. एस. सी. मोटर्सजवळ ही घटना घडली असून माळमारुती पोलिसांनी चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर काही तासांतच न्यू गांधीनगर येथील एका तरुणाला अटक केली असून क्षुल्लक कारणावरून ही घटना घडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने रिक्षाचालकांमध्ये घबराट पसरली आहे. रियाज जैलानी तहसीलदार (वय 55, रा. कचेरी गल्ली, उचगाव) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. अलीमखान आयुबखान पठाण (वय 24, रा. न्यू गांधीनगर) या तरुणाने रियाजच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला आहे.
अलीमखानला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवार दि. 11 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एस. सी. मोटर्सजवळ ही घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी 5 वाजता रियाजने आपली रिक्षा काढली होती. न्यू गांधीनगर येथील अलीमखानने भाडे ठरविले होते. अलीमखानला नेमके कुठे जायचे होते? यासंबंधी तो गोंधळात होता, पत्ता सांगण्यावरून रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात मध्यरात्री वादावादी झाली. वादावादीनंतर चाकूहल्ल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, माळमारुती पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
जखमी रिक्षाचालकाला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी रिक्षाचालक रियाज रक्तबंबाळ झाला होता. या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी हल्लेखोरावर कारवाई करावी, या मागणीसाठी माळमारुती पोलीस स्थानकासमोर ऑटोरिक्षा चालकांची गर्दी झाली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी हल्लेखोराला अटक केल्याचे सांगताच रिक्षाचालक शांत झाले. क्षुल्लक कारणावरून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.