क्षुल्लक कारणावरून समर्थनगरात चाकू हल्ला
आठवडाभरातील दुसऱ्या घटनेने परिसरात दहशत
बेळगाव : क्षुल्लक कारणावरून समर्थनगर येथील एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून याच परिसरात केवळ आठवडाभरात घडलेली चाकू हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. मार्केट पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीनाला अटक केली आहे.आदित्य गजानन सुलधाळ (वय 23) मूळचा राहणार फुलबाग गल्ली, सध्या राहणार समर्थनगर असे जखमी तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री त्याला गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बुधवारी याप्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेऊन त्याला बाल न्याय मंडळीसमोर हजर करण्यात आले आहे. जखमी आदित्य हा एका खासगी कंपनीत काम करतो. रात्री आपल्या मोटारसायकलवरून तो घरी जात होता. त्यावेळी समर्थनगर परिसरात एका तरुणाने मोटारसायकल आडवी लावली होती. ती बाजूला घेण्यास सांगितल्यामुळे वादावादी झाली. वादावादीनंतर आदित्यवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. 25 जून रोजी दुपारी याच समर्थनगर परिसरात अल्ताफ हुसेन मुजावर (वय 52) राहणार शाहूनगर या ऑटोरिक्षाचालकावर चाकू हल्ला करण्यात आला होता. मार्केट पोलीस स्थानकात याप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. भाडे घेऊन गेले असता झालेल्या वादावादीनंतर ही घटना घडली होती. या घटनेपाठोपाठ मंगळवारी रात्री चाकू हल्ल्याचा आणखी एक प्रकार घडला आहे.