बेल्जियममध्ये कुर्द निदर्शनादरम्यान चाकू हल्ला
दोन जणांची प्रकृती गंभीर : अनेक संशयितांना अटक
वृत्तसंस्था/ एंटवर्प
बेल्जियमच्या एंटवर्प शहरात कुर्द समुदायाच्या शांततापूर्ण निदर्शनादरम्यान झालेल्या भीषण चाकू हल्ल्यात 6 जण जखमी झाले असून यातील 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी 4 संशयितांना अटक केली असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. संबंधित हल्ला गुरुवारी संध्याकाळी 7.20 वाजता (स्थानिक प्रमाणवेळेनुसार) ओपेरा हाउस नजीक झाला. येथे कुर्द समुदाय उत्तर सीरियातील कुर्दांच्या समर्थनार्थ एकवटला होता. निदर्शनांमध्ये कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी आणि कुर्द ध्वज फडकविले जात होते. निदर्शने समाप्त झाल्यावर एका समुहाने अचानक चाकूचा वापर करत निदर्शकांवर अंदाधुंद हल्ले पेले.
या प्रकरणाचा तपास सध्या हत्येच्या प्रयत्नाच्या स्वरुपात केला जात असुन याला दहशतवादाच्या श्रेणीत अद्याप ठेवण्यात आलेले नाही. हल्ल्याचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. परंतु सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. संशयितांनी हल्ला करण्यापूर्वी निदर्शकांमध्ये सामील होत त्यांचा विश्वास जिंकला होता असे पोलिसांनी सांगितले आहे.
सीरियाच्या उत्तर भागात कुर्द नेतृत्वाखालील सीरियन डेमोक्रेटिक फोर्सेस आणि सैन्यादरम्यान तणाव वाढलेला असताना ही घटना घडली आहे. अलिकडच्या संघर्षामुळे 1.34 लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. अल जुलानीचे सरकार पूर्ण देशावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.