गुडघ्याला बाशिंग, पण वधू मिळेना !
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
मुलींचा घटलेला जन्मदर, मुलींसह त्यांच्या पालकांच्या अवास्तव अपेक्षा, शेतकरी कुटूंबातील मुलग्याला नकार, सरकारी नोकरीचा अट्टाहास, बेकारी आदी अनेक कारणांमुळे जिह्यातील हजारो तरुण विवाहाच्या प्रतिक्षेत आहेत. यापैकी असंख्य तरुणांनी वयाच्या पस्तीशीचा टप्या ओलांडला असून चाळशीकडे वाटचाल सुरु आहे. या तरुणांनी अनेक वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी त्यांना वधू कधी मिळणार ? हा यक्ष प्रश्न बनला आहे.
शहरासह ग्रामीण भागात सध्या लग्न जुळविण्याचा हंगाम सुरु आहे. सर्वत्र साखरपुडा, लग्न जमविणे व जमविलेल्या लग्नाचा बार उडविण्याचे काम सुरु आहे. परंतु जिह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मुलींचे प्रमाण हजारांच्या मागे सरासरी साडेआठशे ते नऊशे असल्यामुळे नवऱ्याला नवरी मिळेनाशी झाली आहे. काही वर्षापासून मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे. त्याचा परिणाम आता भोगावा लागत आहे. सध्या मुलींचे लग्न अठरा ते वीस वर्ष वय होईपर्यत मुली संगणक, शिलाईकाम, ब्यूटीपार्लर असे कोर्स पूर्ण करुन स्वत:च्या पायावर उभे राहून रोजगार उपलब्ध करत आहेत. काही मूली तर बीएड, डीएड, डॉक्टर, इंजीनियर, वकील आदी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेवून त्या नोकरी करतांना दिसतात. तर काही मुलींनी मोठ्या पदाच्या नोकऱ्या मिळविल्या आहेत. परिणामी या मुली त्यांच्याच योग्यतेचा मुलगा निवडताना दिसत आहेत.
- ...पण मुलगी द्या
मुलींच्या घटत्या जन्मदराने आम्ही हुंडा देतो पण मुलगी द्या मला अशी विनवणी करण्याची वेळ मुलावर आणि त्यांच्या कुटूबियांवर आली आहे. एकतर मोठ्या प्रमाणात झालेली भ्रूणहत्या व गतिमान होत चाललेली शिक्षण चळवळ यामुळे काही प्रमाणात ग्रामीण भागातील मुलांना लग्न जमवितांना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. यामुळे अविवाहित राहण्याची वेळ त्या तरुणावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुलगी बघायला गेलेल्या मुलाचा बाप दबक्या आवाजात आपल्याला हुंडा नको, वाटल्यास आम्ही हुंडा देतो, फक्त मुलगी हवी असे मध्यस्थी माणसांना सांगताना दिसत आहे. ग्रामीण भागातील मुलीसुद्धा लग्नाची घाई न करता शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करतांना दिसत आहेत. बहुसंख्य व्यसनाधीन तरुणांना मुलींकडून नाकारले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उपवर मुलांनी एक प्रकाराची धास्तीच घेतली आहे.
- अपेक्षांच्या चौकटीत न बसणारे तरुण अविवाहित
जिह्यातील कोणतेही गाव असो, अथवा वाडीवस्ती. प्रत्येक गावात सुमारे 40 ते 50 हून अधिक मुले मुलगी न मिळाल्याने अविवाहीत आहेत. यामध्ये त्या मुलांची सांपत्तीक स्थिती योग्य नसने, चांगली नोकरी नाही, दिसण्यासाठी थोडासा कुरुप आहे, घर अथवा पुरेशी इस्टेट नाही अशी अनेक कारणे अविवाहितांचे लग्न जुळण्यासाठी अडथळा ठरत आहेत. मुलींसह त्यांच्या कुटुंबियांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकांच्या राहणीमानात फरक पडला आहे. जे आपण आजूबाजूला पाहतो ते आपल्याला विनासायास मिळायला हवे ही भावना लग्नाच्या विलंबाला कारणीभूत ठरत आहे. सरकारी नोकरी हवी, साधे घर नको, अलिशान बंगला आणि गाडी हवी, सोबत शेतीही हवी, मुलगा निर्व्यसनी पाहिजे, एकत्र कुटूंब नको अशा एक ना अनेक अपेक्षा मुलीकडून व्यक्त केल्या जात आहेत. या चौकटीत न बसणाऱ्या मुलांना अविवाहित राहण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. अविवाहीत मुलांची मानसिक अवस्था अतिशय नाजूक असते. त्यातच शारीरीक गरजा पुर्ण होत नसल्यामुळे मन चिडचिडेपणाचा धोका वाढत आहे.
- बेकारी ठरत आहे लग्नासाठी अडथळा
शिक्षण पूर्ण होऊन देखील अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. आज ना उद्या आपल्याला नोकरी मिळेल या आशेवर ते जगत आहेत. वयाची पस्तीशी ओलांडली असली तरी त्यांना नोकरी नसल्यामुळे मुलींकडून लग्नास नकार दिला जात आहे.
- शेतकरी मुलांना लग्नासाठी नकार
ग्रामीण भागातील मुलींकडून मुलगा सुशिक्षित असला तरी तो केवळ शेतकरी आहे म्हणून त्या मुलांना नाकारले जात आहे. अनेक मुलांनी तिशी गाठली तरी लग्न ठरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दरवर्षी ज्योतिष्यांकडे जाऊन या वर्षी तरी लग्नाचा योग आहे का, हे विचारण्याचा धडाका सुरूच आहे. वर्षानुवर्षे वय वाढत चालल्यामुळे आपल्या वयाची मुलगी मिळेल काय ? आणि मुला-मुलीत वयाचे जास्त अंतर असेल तर लग्न ठरण्यासाठी आणखी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात सुमारे बहुसंख्य मुले मुलींच्या शोधात आहेत.