For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘क्लचप्लेट’वर केएमटीचा रोज अडीच हजार खर्च

12:29 PM Mar 10, 2025 IST | Pooja Marathe
‘क्लचप्लेट’वर केएमटीचा रोज अडीच हजार खर्च
Advertisement

रोज एका केएमटी बसची बदलावी लागते क्लचप्लेटः खराब रस्ते, ओव्हरलोडमुळे लवकर झीजः वर्षाकाठी क्लचप्लेटसाठी ९ लाखांचा खर्च

Advertisement

कोल्हापूरः इम्रान गवंडी

शहरातील खराब रस्ते, वाहतुकीची कोंडी, क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक, वारंवार बदलावे लागणारे गिअर आदी कारणामुळे केएमटी बसच्या क्लचप्लेटांची लवकर झीज होत आहे. परिणामी, केएमटीच्या रोज एका बसची क्लचप्लेट बदलावी लागत आहे. एका क्लचप्लेटसाठी केएमटीला रोज दोन ते अडिच हजार रूपये मोजावे लागत आहेत.

Advertisement

केवळ क्लचप्लेटवर वर्षाकाठी सुमारे 9 लाख खर्च होत आहेत. सध्या प्रवाशांच्या तुलनेत अपुऱ्या बसेस असल्यामुळे क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी भरावे लाग आहेत. त्यातच शहरातील चिंचोळे रस्ते, नियमबाह्य गतीरोधक, वाहनांची वाढलेली संख्या, रस्याच्या दुतर्फा झालेले विक्रेत्यांचे अतिक्रमण यामुळे रोजच वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरातुन बस वारंवार थांबवतथांवबतच चालवावी लागते. त्यातच जागोजागी प्रवाशांना घेण्यासाठी बसचे थांबे होतात. या सर्वच कारणामुळे बसचे गिअर वारंवार चेंज करावे लागतात. शहरात शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये बस चालवावी लागते. याचा भार क्लचप्लेटांवर पडत असतो. लवकर खराब होत आहेत.

केएमटी बसचा रूट एकसारखा नसतो. बसचे अनेक थांबे असतात. उपनगरात तर एकही रस्ता चांगला नाही. उपनगरातील दयनिय झालेल्या रस्त्यावरूनच केएमटी बस रेटली जाते. त्यातच नियमबाह्या गतीरोधकामुळे बसचे कमानपाटे खराब होण्याचे प्रमाणही अधिक आहे. केंद्राच्या योजनेतून केएमटीच्या ताफ्यात 100 नवीन ई-बस दाखल होणार आहेत. मात्र अद्याप ई-बसच्या चार्जिंग स्टेशनसचे काम सुरू आहे. याचे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिन्याचा अवधि लागणार आहे. सध्या तरी केएमटीचा डोलारा केवळ 65 बसेसवर सुरू आहे. यातील बहुतांश बसेस स्क्रॅप होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच अपुऱ्या बसेसमुळे क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरून वाहतुक केली जात असल्यामुळे केएमटीला भार सोसवेनासा झाला आहे. रोज बसचा मेंटनन्स वाढत आहे.

स्टेरींग रॉड, कमानपाट्यांचा खुळखुळा
बसची संख्या कमी असल्यामुळे फेऱ्या वाढवाव्या लागत आहेत. त्यातच क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरले जातात. क्षमतेपेक्षा दुप्पट लोड केएमटी बसला पेलवत नसताना त्यातच खराब रस्ते व नियमबाह्य गतीरोधकांमुळे स्टेरींग रॉड व कमान पाट्यांचा खुळाखुळा होत आहे. स्टेरींग रॉड व कमान पाट्यांवरही महिन्याकाठी लाखोंचा खर्च होत आहे. यामुळे नेहमी ब्रेकडाऊनच्या घटना घडत आहेत.

पार्कींग व अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी
शाहू मैदान, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, मंगळवार पेठ, पद्माराजे मार्ग याठिकाणी गर्दी अधिक असते.शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात शाळा भरताना व सुटताना प्रचंड गर्दी होत असते. सायंकाळच्या वेळीही कामावरून परत येणारे कर्मचारी व इतर कामासाठी नागरिक बाहेर पडलेले असतात. त्यातच शहरातील लहान रस्ते, रस्त्याकडेला पार्कींग व अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते व अडथळा निर्माण होत असतो. दाटीवाटीतूनही प्रवाशांनी फुल्ल भरलेली केएमटी बस चालवावी लागते. यावेळी वारंवार गिअर व क्लचचा वापर करावा लागतो.

एकूण बसची संख्या : 64
रोजचे प्रवासी संख्या : 35 ते 400 हजार
रोजचे उत्पन्न : 6 ते साडेसहा लाख
कायम व कंत्राटी चालक : 200
रस्त्यांचे काम सुरू : बस चलाकांनीही काळजी घ्यावी

शहरातील बहुतांश खराब रस्त्यांचे काम सुरू आहे. त्याचबरोबर खड्यांची माहिती घेवून महापालिकेच्यावतीने पॅचवर्कचे कामही केले जात आहे. केएमटीच्या ताफ्यात नवीन ई-बस दाखल होताच केएमटीवरील भार कमी होईल. केएमटी बस चालकांनीही खड्डे, खराब रस्ते, ओव्हरलोड व गर्दीच्या ठिकाणी बसचा वेग मर्यादित ठेवावा. चालकांकडून बसची निगा राखण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
-   राहुल रोकडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Advertisement
Tags :

.