केएमटीची चाके थांबली...कर्मचारी संपावर!
सातवा वेतन आयोग, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासह अन्य मागण्या; वस्तीच्या गाड्या बंद झाल्याने प्रवाशांचे हाल
कोल्हापूर प्रतिनिधी
सातवा वेतन आयोगाचा प्रस्ताव तत्काळ राज्यशासनाकडे पाठवा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, अनुकंपावरील कर्मचाऱ्यांना कायम करा, 32 टक्के महागाई भत्ता मिळावा, के बॅचमधील कर्मचाऱ्यांना रोजंदारी म्हणून घ्या, यासह अन्य मागण्यासाठी केएमटी कर्मचारी गुरूवारी रात्रीपासून संपावर गेले आहे.
केएमटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्च 2023 रोजी सातवा वेतन आयोगासह विविध मागण्यासाठी संप केला होता. यावेळी माजी पदाधिकारी, महापालिका प्रशासन आणि कर्मचारी यांच्या बैठकीत सातवा वेतन आयोगाचा प्रस्ताव महिन्यात राज्यशासनाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही दिली होती. यासह इतर मागण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली होती. यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. यास आठ महिने होत आले तरी सातवा वेतन आयोगाची फाईल महापालिकेत धुळखात पडून आहे. यासह अन्य मागण्याही प्रलंबित आहेत. त्यामुळे केएमटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (30) रात्री 12 पासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्यासोबत कर्मचारी संघटनेचे नुकतीच बैठक झाली. मात्र, काही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे केएमटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज, शुक्रवारी केएमटीची सेवा बंद राहणार आहे. प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागणार आहे.
संपाच्या आदल्या दिवशीच बससेवा ठप्प, प्रवाशांचे हाल
कर्मचारी संघटनेने गुरूवारी रात्री 12 नंतर संपावर जाणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, काही कर्मचारी गुरूवारी सकाळपासून कामावर आले नाहीत. तसेच गुरूवारी रात्री वस्तीला जाणाऱ्या 18 गाड्याही बंद ठेवल्या. त्यामुळे गुरूवारी दुपारनंतर बस सेवा ठप्प झाली. वस्तीच्या गाड्या बंद केल्याने सायंकाळनंतर प्रवाशांचे हाल झाले.
प्रमोद पाटील गटही संपात सहभागी
मान्यता प्राप्त संघटनेत दोन गट पडले आहेत. मागील संपावेळी प्रारंभी प्रमोद पाटील गट संपात सहभागी झाला नव्हता. वकॅशॉपमध्ये बस बाहेर काढताना तणावपूर्ण वातावरण होते. नंतर प्रमोद पाटील गटही संपात सहभागी झाला. यावेळच्या संपाबाबत पाटील गटाने गुरूवारी बैठक घेतली. केएमटी कर्मचाऱ्यांनीच संप पुकारला असून संपात सहभागी होणार असल्याची भूमिका प्रमोद पाटील यांनी जाहीर केली आहे. आज, शुक्रवारी सकाळी 5.30 वाजता ते सर्वजण वकॅशॉपमध्ये उपस्थित राहणार आहेत.
आठ महिन्यांपूर्वी संप केल्यानंतर प्रशासनने महिन्यांत सातवा वेतन आयोगाचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्याची ग्वाही दिली होती. परंतू अद्यापही प्रस्ताव पाठविलेला नाही. तसेच इतरही मागण्याबाबत प्रशासन उदासिन आहे. पदे रिक्त असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी शासनाची मान्यतेची गरज नाही. तरीही शासनाच्या मान्यतेचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळेच संप पुकारला आहे. प्रवाशी कर्मचाऱ्यांचीही बाजू समजून घेतील, अशी अपेक्षा आहे.
निशिकांत सरनाईक, अध्यक्ष, केएमटी कर्मचारी संघटना