‘सातवा वेतन’मुळे केएमटीवर पडणार 5 कोटींचा बोजा; अखेर अंतिम मंजूरीसाठी प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविला
कोल्हापूर प्रतिनिधी
केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्यासंदर्भातील प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी राज्यशासनाकडे पाठविला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. कर्मचाऱ्यांच्यासाठी ही आनंदाची बाब असली तरी सातवा वेतन आयोगामुळे केएमटीवर अतिरिक्त 5 कोटी 16 लाखांचा भार पडणार आहे. अगोदरच महिन्यांला सुमारे 4 कोटींचा तोटा होत असून यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, केएमटी कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार माहे ऑक्टोबर 2023 चा पगार, कोरोना कालावधीतील थकित 25 टक्के वेतन, बदली कर्मचाऱ्यांना तसलमात दिवाळीपूर्वीच देण्यात आली. सातवा वेतन आयोगाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शनिवारी (दि. 2) राज्य शासनाकडे ई मेलने पाठविण्यात आला आहे.
वर्षाला 16 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार
महागाई भत्ता, सातवा वेतन आयोगामुळे केएमटीवर 16 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 23 टक्के महागाई भत्त्याचा समावेश केल्यामुळे दरमहा 12.50 लाख प्रमाणे वार्षिक 1 कोटी 50 लाख इतका आर्थिक बोजा पडणार आहे. सातवा वेतन आयोगाचे अंमलबजावणीमुळे दरमहा 43 लाख प्रमाणे वार्षिक 5 कोटी 16 लाख इतका आर्थिक बोजा केएमटीवर पडणार आहे.
तोट्यावधी आणखी वाढ होणार
महिन्याला सुमारे 3 कोटी इतका तोटा आहे. सध्या महापालिकेकडून दरमहा 1 कोटी 71 लाख इतके अनुदान के.एम.टी. उपक्रमास दिले जात आहे. के.एम.टी.ची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून सातवा वेतन आयोग आणि 23 टक्के महागाई भत्त्याचा समावेश केल्यानंतर या तोट्यामध्ये आणखी वाढ होणार आहे.
दिवाळीपूर्वीच दिले 2 कोटी 33 लाख
महापालिका प्रशासनाने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना 2 कोटी 33 लाख रूपये दिले आहेत. यामध्ये माहे ऑक्टोबर 2023 चा पगार 1 कोटी 85 लाख, कोरोना कालावधीतील थकित 25 टक्के वेतन 31 लाख आणि बदली (रोजंदारी) कर्मचाऱ्यांना तसलमात म्हणून 10 लाख वाटप केली आहे. याचबरोबरसाठी 7 लाख 50 हजार रूपये गणवेशसाठी दिले आहेत.