Kagal News: धावत्या KMT च्या इंजिनला आग, चालकाच्या हुशारीने आग नियंत्रणात
चालकाने अग्निरोधक साधनाचा वापर करून आग नियंत्रणात आणली
कागल : कागलहून कोल्हापूरला प्रवासी घेऊन चाललेल्या केएमटी बसच्या इंजिनला अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी केली. तसेच बसमधील अग्निरोधक साधनाचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी बसमधून ३५ हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.
सोमवारी सव्वापाच वाजता कागल येथे केएमटी बस स्टॉप शेजारी ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. आपटेनगर कागल ही व्हाया राजारामपूरी जाणारी केएमटी बस पावणेचार वाजता आपटेनगरहून निघाली होती. पाच वाजता ही बस कागलमध्ये पोहोचली.
साळोखेनगरमध्ये जाण्यासाठी सव्वा पाच वाजता ही बस कागलमधून निघाली होती. बसस्टॉप पासून सुमारे पन्नास फूट अंतरावर गेल्यानंतर बसच्या इंजिनने अचानक पेट घेतला. त्याच्यातून आगिच्या ज्वाळा आणि धूर बाहेर येऊ लागला. बस चालक फिरोज फरास याने प्रसंगावधान राखून बस थांबविली.
अग्निरोधक साधनाचा वापर करून आग नियंत्रणात आणली. चालक फरास याने दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सोमवार कागलचा आठवडा बाजार असल्याने बसमध्येही प्रवाशांची गर्दी होती. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनीही जाऊन माहिती घेतली.