केएलएस व्हीडीआयटी-रॉयल एनफिल्डमध्ये समन्वय करार
उत्तर कर्नाटकमधून एकमेव कॉलेजची निवड
बेळगाव : हल्याळ येथील केएलएस व्हीडीआयटी व रॉयल एनफिल्ड या दुचाकी निर्मिती कंपनीमध्ये गुरुवारी समन्वय करार झाला. रॉयल एनफिल्डचे विभागीय प्रशिक्षण व्यवस्थापक बिनॉय एम. व केएलएस व्हीडीआयटीचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन विनायक लोकुर यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी बोलताना बिनॉय एम. म्हणाले, बेळगाव परिसरातील अनेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भेटी दिल्यानंतर केएलएस व्हीडीआयटीमध्ये केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे उत्तर कर्नाटक व गोव्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोग होणार आहे. या करारांतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. केएलएस व्हीडीआयटी हे कर्नाटकातील एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ज्यामध्ये रॉयल एनफिल्ड ट्रेनिंग सेंटर सुरू होणार आहे. या ट्रेनिंग सेंटरमुळे विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे. त्यामुळे रोजगार क्षमता व कौशल्य वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राम भंडारे, सेक्रेटरी विवेक कुलकर्णी, एस. व्ही. गणाचारी, पी. एस. कुलकर्णी, आर. एस. मुतालिक, पी. जी. बडकुंद्री, व्ही. एम. देशपांडे, ए. के. तगारे, अशोक एम. यांच्यासह प्राचार्य व्ही. ए. कुलकर्णी उपस्थित होते.