केएलएस, ठळकवाडी, फिनिक्स उपांत्य फेरीत
फिनिक्स चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : होनगा येथील फिनिक्स स्कूल आयोजित तिसऱ्या फिनिक्स चषक 17 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून फिनिक्स संघाने झेवियर्स संघाचा 4 गड्यांनी, केएलएसने मराठा मंडळाचा 4 गड्याने तर ठळकवाडीने ज्ञान प्रबोधिनीचा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऋषभ बंगोडी, कृष्णा सुतार, हुसेन खान यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. पहिल्या सामन्यात ठळकवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 130 धावा केल्या. त्यात त्यांच्या कृष्णा सुतारने 7 चौकारांसह 40 धावा, प्रज्योत उघाडेने 2 चौकारांसह 27 धावा केल्या. केएलईतर्फे करणने 19 धावांत 3 तर कलशने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलई इंटरनॅशनलचा डाव 15 षटकात 75 धावांत आटोपला. त्यांच्यात करणने 1 षटकार 2 चौकारांसह 21 धावा केल्या. तर युबने 19 धावांचे योगदान दिले.
दुसऱ्या सामन्यात सेंट झेवियर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 130 धावा जमविल्या. त्यात आरुषने 5 चौकारांसह 35, प्रेक्षितने 4 चौकारांसह 28 धावा केल्या. फिनिक्सतर्फे नूतन पुरदने 7 धावांत 3, आयुषने 23 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना झेवियर्सने 16.2 षटकात 4 गडी बाद 132 धावा करत सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात हुसेन खानने 9 चौकारांसह 47, आयुष सावंतने 6 चौकारांसह नाबाद 36 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात केएलएसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मराठा मंडळाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्वगडी बाद 78 धावा जमविल्या. त्यात जितीनने 4 चौकारांसह 29 धावा केल्या. केएलएसतर्फे ऋषभ बंगोडीने 16 धावांत 3 गडी, सोहम पाटीलने 4 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलएसने 10.5 षटकात 6 गडी बाद 79 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात ऋषभ बंगोडीने 5 चौकारांसह नाबाद 24 धावा केल्या.
बुधवारी उपांत्य फेरीचा सामना ठळकवाडी वि. केएलएस यांच्यात सकाळी 9 वाजता. दुसरा उपांत्यफेरीचा सामना फिनिक्स विरुद्ध ज्ञान प्रबोधन यांच्यात 1.30 वाजता खळविण्यात येणार आहे.