केएलईचे कॅन्सर इस्पितळ रुग्णस्नेही ठरावे
खासदार शरद पवार यांचे प्रतिपादन : केएलईच्या कॅन्सर इस्पितळाला भेट
बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी सोमवारी केएलई संस्थेच्या कॅन्सर इस्पितळाला भेट देऊन पाहणी केली. नव्याने उभारण्यात आलेल्या इस्पितळातील सोयी-सुविधांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, संचालक महांतेश कवटगीमठ, डॉ. व्ही. एस. साधुनावर, काहेरचे उपकुलगुरु डॉ. नितीन गंगाणे, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. महांतशेट्टी, उपप्राचार्य राजेश पवार, डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, इस्पितळाचे कार्यवाह डॉ. नवीन एन. आदींसह केएलई संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
इस्पितळाची पाहणी करून शरद पवार म्हणाले, आपल्याच हस्ते या इस्पितळाचे भूमीपूजन झाले आहे. आता कॅन्सरवर उपचारासाठी सुसज्ज इस्पितळ उभे आहे. इमारत व तिची रचना खूप सुंदर आहे. हे इस्पितळ रुग्णस्नेही ठरावे. या इस्पितळात उत्तम उपचार उपलब्ध व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कॅन्सर इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी संपूर्ण इस्पितळासंबंधी माहिती दिली. यावेळी बोलताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, इस्पितळाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या एक विभाग सुरू करून उपचार दिले जात आहेत. पुढील दोन महिन्यांत पूर्ण प्रमाणात हे इस्पितळ रुग्णसेवेसाठी मुक्त होणार आहे. या परिसरात कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी अत्याधुनिक इस्पितळाची गरज होती. एकाच छताखाली सर्व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी या इस्पितळाची उभारणी करण्यात आली आहे. लवकरच जनसेवेसाठी ते खुले करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.