सांबरे येथील अस्वस्थ भाविकांच्या दिमतीला केएलईचे वैद्यकीय पथक
नर्सिंग कर्मचारी, रुग्णवाहिका, औषधेही दाखल : महाप्रसादातून 200 हून अधिक भाविकांना अन्नातून झाली होती विषबाधा
प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे अन्नातून विषबाधा झाल्याने अस्वस्थ झालेल्या भाविकांवर उपचार करण्यासाठी केएलई संस्थेचे वैद्यकीय पथक धावून गेले आहे. सांबरे येथे रात्री वास्तव्य करून अस्वस्थ रुग्णांवर उपचार केले.
सांबरे येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद घेतलेल्या भाविकांपैकी 200 हून अधिक भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याने ते अस्वस्थ झाले. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना याबाबतची माहिती समजताच त्यांनी एक डॉक्टरांचे पथक सांबरे येथे पाठविले.
डॉक्टर, नर्सिंग कर्मचाऱ्यांतर्फे उपचार सुरू
अन्नातून विषबाधा होऊन काही भाविक अत्यवस्थ झाल्याने चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांनी डॉ. प्रभाकर केरे यांच्याशी संपर्क साधून डॉक्टरांचे पथक व औषधे सांबरे येथे पाठवून देण्याची विनंती केली. डॉ. कोरे यांनी वैद्यकीय संचालक डॉ. एम. दयानंद व डॉ. माधव प्रभू यांच्या नेतृत्त्वाखाली वैद्यकीय पथक सांबरे येथे पाठविले. तसेच डॉ. कोरे रुग्णालयातील अतिदक्षता विभाग व बेड राखून ठेवण्यात आले. 20 डॉक्टर, 10 नर्सिंग कर्मचारी, 5 रुग्णवाहिका व औषधे दाखल झाल्यानंतर अस्वस्थ भाविकांवर उपचार सुरू करण्यात आले.
केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. दयानंद यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.