केएलई इंटरनॅशनलकडे हनुमान चषक
ज्ञानप्रबोधन उपविजेता, साईराज पोरवाल ‘मालिकावीर’, कौस्तुभ पाटील ‘सामनावीर’
बेळगाव : बेळगाव क्रिकेट क्लब आयोजित हनुमान चषक 14 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केएलई इंटरनॅशनल संघाने ज्ञानप्रबोधन संघाचा 51 धावांनी पराभव करुन हनुमान चषक पटकाविला. कौस्तुभ पाटील याला ‘सामनावीर’ तर साईराज पोरवाल याला ‘मालिकावीर’ने गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ज्ञानप्रबोधनने वनिताचा 12 धावांनी पराभव केला. ज्ञानप्रबोधनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्वगडी बाद 129 धावा केल्या. त्यात मंजुनाथ शर्माने 5 चौकारांसह 34, अद्वैत भट्टने 27, सुजल गोरलने 23 तर विरनने 11 धावा केल्या. वनितातर्फे फैयाज काझीने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना वनिताने 20 षटकात 7 गडी बाद 117 धावा केल्या. त्यात झोया काझीने 64, तर शुभम कंग्राळकरने 20 धावा केल्या. ज्ञानप्रबोधनतर्फे सुजल, आयुष, अद्वैत व गुरव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केएलईने हेरवाडकरचा 65 धावांनी पराभव केला. केएलई प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 गडी बाद 144 धावा केल्या. त्यात स्वयंम खोतने 60, कौस्तुभ पाटीलने 46, आदित्य हुंबरवाडीने 17 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना हेरवाडकरने 20 षटकात 7 गडी बाद 79 धावाच केल्या. त्यात आर्यन बांदिवडेकरने 52 धावा केल्या. मंगळवारी सकाळी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात केएलई इंटरनॅशनलने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 139 धावा केल्या. त्यात कौस्तुभ पाटीलने 1 षटकार, 3 चौकारांसह 28, साईराज पोरवालने 26, शिवम खोतने 25 आदित्य हुंबरवाडीने 21 धावा केल्या. ज्ञानप्रबोधनतर्फे आयुष अर्जुनवाडकर, श्रेयश तिळवे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ज्ञानप्रबोधनचा डाव 17.5 षटकात सर्वगडी बाद 108 धावांत आटोपला. त्यात मंथन शर्माने 38, अद्वैत भटने 20 तर आयुष अर्जुनवाडकर व साईराज तिळवे यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. केएलईतर्फे कौस्तुभ पाटीलने 22 धावांत 4, साईराज पोरवाल व अतिथी भोगण यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, एसकेई प्लॅटिनम मैदानाचे चेअरमन आनंद सराफ, पुरस्कृते आनंद सोमनाचे, उमेश कुरिहाळकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या केएलई व उपविजेत्या ज्ञानप्रबोधन संघाला चषक, प्रमाणपत्र व पदके देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर कौस्तुभ पाटील-केएलई, उत्कृष्ट फलंदाज मंथन शर्मा-ज्ञानप्रबोधन, उत्कृष्ट गोलंदाज-ऋभष पाटील-केएलई, मालिकावीर साईराज-केएलई यांना चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून दत्तप्रसाद जांबवलेकर, जोतिबा पवार, तेजस पवार, सोमनाथ सोमनाचे तर स्कोरर म्हणून प्रमोद जपे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्राऊंडस्मन आनंद कोरुगडे, प्रसाद नाकाडी, प्रभाकर कंग्राळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विवेक पाटील, प्रमोद पालेकर, रोहीत दोडवाड आदी उपस्थित होते.