कोलकाताचा 5 धावांनी विजय
सामनावीर वरुण चक्रवर्तीचे षटक ठरले निर्णायक, कर्णधार नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल यांची फटकेबाजी
वृत्तसंस्था /हैद्राबाद
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने यजमान सनरायजर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला. या स्पर्धेत आता हैदराबाद संघाने 9 सामन्यातून 3 विजयासह सहा गुण घेत शेवटून दुसरे स्थान तर कोलकाता नाईट रायडर्सने 10 सामन्यातून 4 विजयासह 8 गुण घेत आठवे स्थान मिळवले आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाला कोलकाताकडून मिळालेले 172 धावांचे आव्हान कठीणच गेले. हैदराबाद संघातील कर्णधार एडन मारक्रमने 40 चेंडूत 4 चौकारासह 41 धावा जमवल्या. तर हेन्रिच क्लासेनने 20 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 36 धावा केल्या. अब्दुल समदने 18 चेंडूत 3 चौकारासह 21 तसेच राहुल त्रिपाठीने 9 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 20 आणि सलामीच्या मयांक अगरवालने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 18 धावा जमवल्या. पॉवर प्ले दरम्यान हैदराबाद संघाने 3 गडी गमावताना 53 धावांची भर घातली होती. मारक्रम आणि क्लासेन या जोडीने पाचव्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. हैदराबाद संघाने 20 षटकात 8 बाद 166 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 5 धावांनी गमवावा लागला. हैदराबादच्या डावामध्ये 5 षटकार आणि 15 चौकार नोंदवले गेले. हैदराबाद संघाला अवांतराच्या रुपात 14 धावा मिळाल्या. त्यात 4 वाईड, 3 नोबॉल, 6 लेगबाईज आणि एक बाईजचा समावेश आहे. कोलकाता संघातर्फे शार्दुल ठाकुरने 23 धावात 2, अरोराने 32 धावात 2, हर्षित राणा, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
रिंकू सिंगची फटकेबाजी
तत्पूर्वी कोलकाता संघाने हैदराबादला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले. या स्पर्धेतील हा 47 वा सामना होता. कोलकाता संघातर्फे कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी समयोचित फलंदाजी केली. तर त्यांना जेसन रॉय आणि आंद्रे रसेल यांच्याकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीचा फलंदाज गुरबाज डावातील दुसऱ्याच षटकात खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद झाला. मार्को जान्सेन त्याला ब्रुककरवी झेलबाद केले. जान्सेनने कोलकाता संघाला आणखी एक धक्का देताना वेंकटेश अय्यरला 7 धावावर तंबूचा रस्ता दाखवला. कार्तिक त्यागीने सलामीच्या जेसन रॉयला बाद केले. रॉयने 19 चेंडूत 4 चौकारासह 20 धावा जमवल्या. कोलकाताची स्थिती यावेळी 4.4 षटकात 3 बाद 35 अशी होती. कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 6.4 षटकात 61 धावांची भागीदारी केली. डावातील 12 व्या षटकात नितीश राणा मार्करमच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 31 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 42 धावा जमवल्या. नितीश राणा बाद झाल्यानंतर रिंकू सिंग आणि रसेल यांनी पाचव्या गड्यासाठी 29 धावांची भर घातली. मार्कंडेने रसेलला झेलबाद केले. त्याने 15 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 24 धावा जमवल्या. सुनील नरेन केवळ एक धाव जमवत बाद झाला. शार्दुल ठाकुर 1 चौकारासह 8 धावा केल्या. रिंकू सिंगने 35 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 46 धावा जमवत तो आठव्या गड्याच्या रुपात बाद झाला. डावातील शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हर्षित राणा खाते उघडण्यापूर्वी धावचित झाला. अनुकूल रॉयने 2 चौकारासह नाबाद 13 तर अरोराने नाबाद 2 धावा जमवल्या. हैदराबादतर्फे जान्सेन, टी. नटराजन यांनी प्रत्येकी दोन तर भुवनेश्वरकुमार, कार्तिक त्यागी, मार्करम आणि मार्कंडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकात 9 बाद 171 (रिंकू सिंग 35 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 46, नितीश राणा 31 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 42, जेसन रॉय 19 चेंडूत 20, रसेल 15 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 24, अनुकूल रॉय 7 चेंडूत नाबाद 13, ठाकुर 6 चेंडूत 8, वेंकटेश अय्यर 7, सुनील नरेन 1, अवांतर 8. गोलंदाजी : जान्सेन 2-24, टी. नटराजन 2-30, भुवनेश्वरकुमार 1-33, त्यागी 1-30, मार्कंडे 1-29).
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकात 8 बाद 166 (अभिषेक शर्मा 9, मयांक अगरवाल 11 चेंडूत 18, राहुल त्रिपाठी 9 चेंडूत 20, मारक्रेम 40 चेंडूत 41, ब्रुक 0, क्लासन 20 चेंडूत 36, अब्दुल समद 18 चेंडूत 21, जेनसेन 1, भुवनेश्वरकुमार नाबाद 5, मार्कंडे नाबाद 1, अवांतर 14, गोलंदाजी : वैभव अरोरा 2-32, शार्दुल ठाकुर 2-23, हर्षित राणा 1-27, अंकुल रॉय 1-26, रसेल 1-15, चक्रवर्ती 1-20).