केकेआर-लखनौ आज आमनेसामने
वृत्तसंस्था
लखनौ : ’कर्णधाराची गुणवत्ता त्याच्या संघावर अवलंबून असते’ ही म्हण रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणे या दोघांसाठीही कटू सत्य आहे. आज रविवारी आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स व कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांसमोर उभे ठाकणार असताना दोघांच्याही नेतृत्वावर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या संबंधित संघाच्या खालावत चाललेल्या कामगिरीचे प्रतिबिंब त्यात पडते.
आयपीएल, 2025 मधील निराशाजनक कामगिरीनंतरही रहाणेला कर्णधारपदी कायम ठेवण्याच्या केकेआरच्या धाडसी निर्णयावर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चर्चा सुरू झाली होती. अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने चिंता अधिकच वाढली आहे. त्यांना पहिला विजय नोंदवण्यासाठी सात सामने लागले आणि हा विजय सांघिक प्रयत्नांपेक्षा रिंकू सिंगच्या वैयक्तिक कौशल्यामुळे मिळाला. हे खरे आहे की, रहाणेने सकारात्मक इराद्याची झलक दाखवलेली आहे (मुंबई इंडियन्सविऊद्ध 40 चेंडूंत 67 धावा आणि एलएसजीविऊद्ध 24 चेंडूंत वेगवान 41 धावा). परंतु वेगवान क्रिकेटच्या या स्वरुपात अशा सुऊवातीचे क्वचितच सामन्याला कलाटणी देणाऱ्या योगदानात रूपांतर झाले आहे.
कमकुवत वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाज वऊण चक्रवर्तीच्या खराब कामगिरीमुळेही रहाणेच्या समस्यांत भर पडली आहेत. त्याशिवाय रचिन रवींद्र अजूनही राखीव खेळाडूंमध्येच बसून आहे, तर फिन अॅलन आणि टिम सिफर्ट यांच्या वाट्याला संगीत खुर्ची आलेली आहे. नाणेफेकीच्या वेळी रहाणेचे निर्णयही गोंधळात टाकणारे ठरले आहेत. केकेआर कदाचित एकाना स्टेडियममध्ये काहीशा आत्मविश्वासाने उतरेल, पण केवळ तीन गुण पदरी असल्याने त्यांना आता त्यांच्या उर्वरित सात सामन्यांमधून किमान सहा विजय मिळवणे आवश्यक आहे, जे अशक्यप्राय काम वाटते.
एलएसजीची मोहीमही विस्कळीत झाली आहे. अर्ध्या टप्प्यावर केवळ दोन विजयांसह नवव्या स्थानावर असलेला पंतच्या नेतृत्वाखालील संघही स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. त्यास सलग चार पराभव आणि कर्णधाराच्या मैदानातील वादग्रस्त निर्णयांची मालिका कारणीभूत आहे. पंतचा संघर्ष तर स्पष्टपणे दिसून आला आहे. सनरायझर्स हैदराबादविऊद्ध सामना जिंकून देणाऱ्या नाबाद 67 धावांच्या खेळीनंतर त्याने पाच डावांमध्ये केवळ 72 धावा केल्या आहेत.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.